मुंबईः शिवसेना सोडणार नाही पण शिवसेनेलाही सोडणार नाही, असा चंगच जणू एकनाथ शिंदे यांनी बांधला असल्याचं सध्याच्या राजकीय घडामोडींवरून दिसून येतंय. शिवसेना पक्ष ताब्यात घेण्याच्या दृष्टीने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आता कायदेशीर पाऊलं टाकण्यास सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे गटाने बुधवारी केंद्रीय निवडणूक आयोगाला (Election commission) पत्र दिलं आहे. शिंदे गटाला शिवसेना (Shivsena) म्हणून मान्यता मिळावी, तसेच धनुष्यबाणही आपल्याच गटाला मिळावे, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. आता एकनाथ शिंदे ठाकरेंविरोधात पुढचं पाऊल टाकण्याच्या तयारीत आहेत. लोकप्रतिनिधीनंतर शिवसेनेच्या प्रतिनिधी सभेतील सदस्य कसे फोडता येतील, याकडे शिंदेंनी मोर्चा वळवला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या संघटनेत प्रतिनिधी सभेला खूप महत्त्व आहे. या सभेत 282 सदस्यसंख्या आहे. एकनाथ शिंदे आता यातील दोन तृतीयांश म्हणजेच 188 सदस्य फोडण्याच्या तयारीत आहेत. शिंदेंच्या नंदनवन या निवासस्थानी यासाठी मोठी खलबतं सुरु असल्याची चर्चा आहे.
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवरील सदस्य निवडून देण्याचा अधिकार प्रतिनिधी सभेला आहे. यात आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख, जिल्हा संपर्कप्रमुख आणि मुंबईतील विभाग प्रमुख यांची मिळून एक प्रतिनिधी सभा आहे. सध्या या प्रतिनिधी सभेत एकूण 282 सदस्य आहेत. यापैकी किमान दोन तृतीयांश सदस्यांचा एकनाथ सिंदे गटाला पाठिंबा मिळाला तर ठाकरेंची शिवसेना अडचणीत येऊ शकते. त्यामुळे एकनाथ शिंदे गटात प्रतिनिधी सभा फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खलबतं सुरु आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या मिशनमध्ये एकनाथ शिंदेंचा गट यशस्वी झाला तर या संकटातून शिवसेना सावरणं उद्धव ठाकरेंसाठी कठीण होऊ शकतं.
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील एकूण 15 सदस्यांपैकी 5 सदस्यांची निवड पक्षप्रमुखाद्वारे केली जाते. तर उर्वरीत 9 सदस्य प्रतिनिधी सभेकडून निवडून दिले जातात. यांना पक्ष नेते असंही म्हणतात. दर पाच वर्षांनी ही निवडणूक होते. 2018 मध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्य निवडण्यात आले होते. यात आदित्य ठाकरे, मनोहर जोशी, लीलाधर डाके, सुभाष देसाई, दिवाकर रावते, संजय राऊत आणि गजानन कीर्तिकर यांचा समावेश आहे. नुकत्याच झालेल्या बंडानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे, आनंदराव अडसूळ, रामदास कदम यांची हकालपट्टी केली. तर सुधीर जोशी यांचे निधन झाले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकारिणीत उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ सदस्य उरले आहेत.
शिवसेनेच्या प्रतिनिधी सभेला फोडण्याच एकनाथ शिंदेंचे प्रयत्न अपयशी ठरतील, असा दावा राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्य चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. ते म्हणाले, धनुष्यबाण हा उद्धव ठाकरेंचाच असेल. घटनेप्रमाणे प्रतिनिधी सभा निवडून दिलेली आहे. तिची यादी इलेक्शन कमिशनकडे आहेत. शिंदेंनी काहीही केले तर आमचेही प्रयत्न सुरु आहेत. वकिलांचं काम सुरु आहे. आम्ही सर्व शिवसैनिक छातीला धनुष्यबाण लावून फिरतोय त्यामुळे हा धनुष्यबाण उद्धव साहेबांकडेच राहील, असा दावा खैरे यांनी केलाय.