मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबद्दल नवा दावा केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारण्याआधी ते शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या निवासस्थानी आले होते. तेव्हा त्यांनी आपल्याला जेलमध्ये टाकलं जाईल या भीतीने ते रडले होते, असा मोठा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केलाय. त्यांच्या या गौप्यस्फोटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
“राज्यात जेव्हा सरकार अस्थिर करण्यासाठी घडामोडी सुरु होत्या तेव्हा 20 मे रोजी गद्दारांच्या गँगलीडरला वर्षा बंगल्यावर बोलावण्यात आलं होतं. तेव्हा त्यांना विचारण्यात आलं होतं की, तुम्ही गद्दारी करु का इच्छित आहात? जे काही कानावर येतंय ते खरं आहे का? तेव्हा ते रडले होते. कधीही अटक होऊ शकते, खूप दबाव आहे. पण असंच म्हणत आहेत. जाणार नाही, असं खोटं सांगून नंतर आपण जे झालं ते पाहिलं”, अशी प्रतिक्रिया आज आदित्य ठाकरे यांनी दिली. त्याआधी आदित्य ठाकरे यांनी एका मुलाखतीत याबाबतचा गौप्यस्फोट करुन खळबळ उडवून दिली आहे.
“अरे ते जाऊदे. आदित्य ठाकरे अजून लहान आहेत”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. एकनाथ शिंदे यांच्या या प्रतिक्रियेबद्दल आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी पुन्हा प्रत्युत्तर दिलं. “तुम्ही विचार करा, मी जेव्हा मोठा होईल तेव्हा त्यांना माझी किती भीती वाटेल”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
“हे 40 लोकं त्यांच्या स्वत:च्या जागांसाठी आणि पैशांसाठी तिकडे गेले आहेत. सध्याचे मुख्यमंत्री त्यावेळी माझ्या घरी येऊन रडले होते. कारण त्यांना केंद्रीय यंत्रणा अटक करणार होत्या. त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी भाजपसोबत गेलो नाही तर मला अटक होईल”, असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला. त्यांचा हा गौप्यस्फोट खरा असल्याचं खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.
दुसरीकडे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी या प्रकरणावर भूमिका मांडली आहे. एकनाथ शिंदे हे आमची बाजू मांडण्यासाठी मातोश्रीवर गेले होते, अशी प्रतिक्रिया शिरसाट यांनी दिलीय. “मला वाटतं आदित्य ठाकरे यांनी रडायचे असा शब्द चुकीचा वापरला आहे. आम्ही सर्वच आमदार स्वत: उद्धव ठाकरे यांना भेटलो होतो. त्यांना सांगितलं होतं की, आपल्याला या आघाडीत राहायचं नाही”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली. तसेच “शिंदे निश्चित उद्धव ठाकरे यांना भेटायला गेले असतील. पण ते आघाडीमधून बाहेर पडावं, अशी सर्व आमदारांची इच्छा आहे हे सांगायला गेले होते”, असं संजय शिरसाट यांनी सांगितलं.