नवी दिल्ली: भाजप नेते रावसाहेब दानवे (raosaheb danve) यांनी राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी ‘मिशन 48’ राबवणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं गेलं. भाजप (bjp) जर मिशन 48 राबवणार असेल तर शिंदे गटाचं काय? असा सवालही या निमित्ताने उपस्थित केला गेला. मात्र, त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी उत्तर दिलं आहे. भाजप मिशन 48 राबवत आहे ही चांगली गोष्ट आहे. मिशन 48 हे भाजप आणि शिवसेनेचं मिळून आहे. आम्ही युतीत आहोत. राज्यात आमचं सरकार आहे. त्यामुळे आम्ही मजबुतीनं काम करू, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल. सरकार स्थापनेचा आणि कोर्टाच्या खटल्याचा काहीच संबंध नाही. कोर्टाने मंत्रिमंडळ विस्तारावर कोणताही स्टे दिला नाही. त्यामुळे विस्तार लवकर होईल. आम्ही नवीन सरकार स्थापन केलं आहे. थोडा वेळ देणार की नाही?, असा मिश्किल सवालही शिंदे यांनी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत. दिल्लीत नीती आयोगाच्या बैठकीला हजेरी लावल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. अजित पवार मला भेटले होते. पूरपरिस्थितीबाबतचं निवेदन देण्यासाठी ते आले होते. त्यावेळी तुम्ही दोघे चांगलं काम करत आहात. लवकर लवकर निर्णय घेत आहात असं अजितदादा म्हणाले होते. अजितदादा आणि आमचे चांगले संबंध आहेत. अगदी जिव्हाळ्याचे संबंध आहेत, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
आज मैत्री दिनानिमित्ताने शिंदे गटाच्या आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच शिंदे यांच्यासोबत एकत्र येण्याचं आवाहनही केलं. त्याबाबत शिंदे यांना विचारण्यात आलं. तुम्हीही उद्धव ठाकरेंना मैत्री दिनाच्या शुभेच्छा देणार का? असा सवाल शिंदे यांना करण्यात आला. त्यावर शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली नाही. फक्त फ्रेंडशीप डे सर्वांसाठी असतो, माझ्या सर्वांना शुभेच्छा आहेत, असं म्हणून शिंदे यांनी वेळ मारून नेली.
नीती आयोगाच्या बैठकीत शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून आणण्यावर चर्चा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. शिक्षणावरही आपण काम करत आहोत. शिक्षकांचं मोठं योगदान आहे. ‘आमचे गुरुजी’ ही संकल्पना शाळेत राबवणार आहोत. या संकल्पनेनुसार जे शिक्षक शिकवतात त्यांचे फोटे शाळेत लावणार आहोत. एक शिक्षक शाळा असता कामा नये, यावर चर्चा झाली. शाळाचं डिजिटलायझेशन करण्यावर चर्चा झाली. शिक्षणाचं अपग्रेडेशन करण्यावरही चर्चा केली. राष्ट्रीय शिक्षण धोरणावर चर्चा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
केंद्र सरकारला 18 हजार कोटीचे प्रस्ताव पाठवले आहेत. एकूण 77 तलावांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. त्यासाठी 580 कोटी प्रस्ताव केंद्राला दिले आहेत. अमृत वॉटर सप्लाय आणि सिव्हरेज स्किमसाठी 28 हजार कोटीचं उद्दिष्टे आहे. त्यापैकी 18 हजार कोटीचे प्रस्ताव केंद्राला पाठवले आहे. सेव्हन स्टार रँकिंगचे टॉयलेट100 ठिकाणी बनवायचे आहे. तसेच सॅनिटेशन आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे 12 हजार कोटीचे प्रस्तावही पाठवले आहेत, असं त्यांनी सांगितलं. जीएसटीचा परतावा मिळेल. निधी मिळेल. युतीचं सरकार आहे. सर्व सामान्यांच्या हिताचे प्रकल्प थांबणार नाहीत, असं आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याची माहितीही त्यांनी दिली.