मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचं निशाण फडकावलं आहे. त्यांचं बंड शमवण्यासाठी शिवसेनेकडून हरप्रकारे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठीच शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) आणि रविंद्र फाटक यांना सूरतला शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठवलं. सूरतमधील हॉटेल लि मेरेडियनमध्ये त्यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. जवळपास 18 मिनिटे ही चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. नार्वेकर यांच्या फोनवरुनच शिंदे आणि ठाकरे यांच्यात बोलणं झालं असल्याचं सूत्रांकडून कळतंय. शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात नेमकं काय बोलणं झालं याची काही माहितीही समोर आलीय.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत संवाद साधला. त्यावेळी गटनेतेपदावरुन शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. मी कुठला पक्ष काढला नाही, कुठल्या कागदावर सही केली नाही, पक्षाविरोधात काही बोललो नाही, वेगळा गट स्थापन केला नाही, मग माझं गटनेतेपद का काढण्यात आलं? माझ्यावर ही कारवाई का? असा सवाल शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना केल्याची माहिती मिळतेय.
दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याबाबतही शिंदे यांनी नाराजी व्यक्त केलीय. संजय राऊत माझ्याशी फोनवर चांगलं बोलतात. त्यांचं माझ्याशी सकाळपासून तीन ते चार वेळा बोलणं झालं आहे. फोनवर ते व्यवस्थित बोलतात. मग माध्यमांसमोर ते माझ्यावर का टीका करत आहेत. शिंदे यांनी शिवसेना आमदारांचं अपहरण केलं, शिवसेना आमदारांना गुजरातमध्ये मारहाण करण्यात आली, त्यांना जीवे मारलं जाऊ शकतं, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला होता. शिंदेंचा गैरसमज झाला म्हणणारे राऊत आमदारांचं अपहरण झाल्याचा आरोप का करतात? असा सवालही शिंदे यांनी विचारलाय.
त्याचबरोबर शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बोलताना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजपसोबत जाण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सत्ता नको, अशी भूमिका शिंदे यांची आहे. आपली भूमिका त्यांनी उद्धव ठाकरेंना बोलून दाखवल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळतेय.