मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेत मोठा भूकंप पाहायला मिळतोय. अशावेळी शिवसेनेकडून आता डॅमेज कंट्रोलला सुरुवात झालीय. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून बैठकांचा सिलसिला सुरु झालाय. आज शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत बंडखोर आमदारांवर कारवाईचा ठराव अपेक्षित होता. मात्र अद्याप तशी कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. शिवसेनेच्या कार्यकारिणी बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाकडूनही ऑनलाईन पद्धतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्याकडून पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरं देण्यात आली. एका प्रश्नाला उत्तर देताना केसरकर यांनी कुठल्याही स्थितीत आमचा पाठिंबा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला असणार नाही, असं केसरकर यांनी स्पष्ट केलंय.
आम्ही शिवसेनेच्या, बाळासाहेबांच्या विचारांचे आहोत. ज्या राष्ट्रवादीने आमचा पक्ष हायजॅक करण्याचा प्रयत्न केला होता. आमच्या आमदारांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला होता. आमच्या खासदारांनाही त्रास दिला गेला. अशास्थितीत शिवसेनेचं अस्तित्व टिकावं यासाठी हा निर्णय घेतलाय. आज राष्ट्रवादी, आणि काँग्रेसचं बहुमत संपलेलं आहे. त्यामुळे त्या अशा युक्त्या वापरू शकतील. जे काही कुणाशी बोलायचं असेल त्याचे अधिकार शिंदे साहेबांना दिले आहेत. शिंदे साहेब आपल्या पक्षाच्या संपर्कात आहेतच. त्यांना जो काही निर्णय घ्यायचा तो ते घेतील. पण कुठल्याही स्थितीत आमचा पाठिंबा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नाही, असं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलंय.
आम्ही शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेलो आहोत. आमच्याकडे दोन तृतियांश बहुमत असल्याने आम्ही शिवसेनेचे सदस्य आहोत, शिवसेनेच्या विधिमंडळाचे सदस्य आहोत. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव वापरायचं नाही असं जर असेल तर निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार आम्ही त्याचा विचार करु, असंही केसरकर यांनी सांगितलं.
आम्हीच शिवसेना आहोत. आम्ही कशाला शिवसेनेचा पाठिंबा काढू, शिंदे साहेबांना गटनेते पदावरुन काढण्याचा प्रयत्न केला. म्हणून आम्ही दोन तृतियांश बहुमत सिद्ध करु, शिंदे साहेब आमचे गटनेते राहतील, असंही शिंदे गटाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.