राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते छगन भुजबळ सध्या नाराज आहेत. त्यांनी स्वपक्षाविरोधात आघाडी उघडली आहे. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळालं नाही. त्यानंतर छगन भुजबळ यांनी मनातील खदखद बोलून दाखवली. मंत्रिपद न मिळण्यापेक्षा पक्षाकडून त्यांना जी वागणूक मिळाली, त्यामुळे भुजबळ जास्त दुखावले. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलल्याने राज्यभरातील ओबीसी संघटनांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं. अनेक ओबीसी नेत्यांनी छगन भुजबळ यांचं समर्थन केलं. आता पक्षाध्यक्ष अजित पवारांसह अन्य मोठे नेते छगन भुजबळ यांची नाराजी दूर करणार असल्याची माहिती आहे. या दरम्यान छगन भुजबळ यांच्या नाशिक जिल्ह्यातील त्यांच्या एका कट्टर विरोधकाने आज अजित पवार यांची भेट घेतली.
नांदगावमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी आज नागपूरमध्ये अजित पवार यांची भेट घेतली. “अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी भेटलो नव्हतो, शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने भेट घेतली” असं सुहास कांदे म्हणाले. सुहास कांदे हे नाशिकमधील छगन भुजबळ यांचे कट्टर विरोधक समजले जातात. महायुतीमध्ये असूनही छगन भुजबळ यांच्या पुतण्याने समीर भुजबळने सुहास कांदेंविरोधात अपक्ष निवडणूक लढवली. पण समीर भुजबळ यांचा पराभव झाला. यावेळी मतदारसंघात सुहास कांदे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाल्याचे व्हिडिओ व्हायरल झालेले.
‘जे झालं ते योग्य झालं’
नाशिकमध्ये सध्या जे काही चाललय, त्याकडे तुम्ही कसं बघता? यावर “आंनदाने बघतो, जे झालं ते योग्य झालं. दादांनी नाशिक जिल्ह्याला न्याय दिला” अशी प्रतिक्रिया सुहास कांदे यांनी दिली. आमदाराच्या विरोधात काम झाल समीर भुजबळांना उभ केलं? त्यावर सुहास कांदे म्हणाले की, “सगळ्यांच्या विरोधात काम केलं. भुजबळांना मी कालही बोलला, आजही बोलतो आणि उद्याही बोलेन. मी तेच पुरावे वरिष्ठांकडे दिले आहेत. विधानसभेला, लोकसभेला विरोधात काम केलं. सुहास कांदेच्या भूमिकेनंतर किंवा पुराव्यानंतर हे सर्व घडलं, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही”
‘कुठे जायची, त्यांच्यात हिम्मत नाही’
तुम्ही सध्या खुश दिसताय, या प्रश्नावर ‘भुजबळच वाईट होतं, तेव्हा नेहमी मी खुश असतो’ असं उत्तर दिलं. “भुजबळांना अंतर्गत, बाहेरचा सर्वांचा विरोध होता. भुजबळांच वाईट होतं, तेव्हा आनंद होतो म्हणजे, भुजबळांना त्यांच्या वाईट कृत्याच जेव्हा फळ मिळतं, तेव्हा आनंद होतो असं मला म्हणायच आहे” छगन भुजबळ बाहेर पडणार का? या प्रश्नावर सुहास कांदे म्हणाले की, “त्यांच्यात हिम्मत नाही. भुजबळांना चॅलेंज करतो, ते वेगळे होऊच शकत नाही. कुठे जायची, त्यांच्यात हिम्मत नाही”