मुंबई: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर आता शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (devendra fadnavis) हे मुंबईत येत आहेत. दुपारी 1 वाजता चार्टड फ्लाईटने शिंदे मुंबईत (mumbai) येत आहेत. त्यांच्यासोबत दीपक केसरकर आणि बच्चू कडूही असतील असं सांगितलं जात आहे. त्यामुळे वाकोला विमानतळावर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच शिंदे येण्याच्या आधी आणि वेळेला या ठिकाणी कुणालाही जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. शिंदे मुंबईत आल्यानंतर थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. सागरवर जाऊन ते फडणवीसांसोबत संवाद साधतील. सत्तेचा फॉर्म्युला याच बैठकीत ठरवला जाणार असून कदाचित फडणवीस आणि शिंदे हे दोघेही मिळून आजच राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा करतील, असं सांगितलं जात आहे.
एकनाथ शिंदे तब्बल नऊ दिवसानंतर आज दुपारी 1 वाजता मुंबईत येत आहेत. ते वाकोला विमानतळाच्या गेट क्रमांक 8 मधून बाहेर पडतील. हा गेट व्हीव्हीआयपी गेट आहे. शिंदे येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हा गेट नो पार्किंग झोन जाहीर करण्यात आला आहे. तसेच शिंदे येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळाभोवती चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सीआयएसएफचे जवान आणि मुंबई पोलीस या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले आहेत.
शिंदे मुंबईत आल्यानंतर थेट सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहेत. यावेळी चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, प्रवीण दरेकर आणि गिरीश महाजन आदी नेते उपस्थित असतील असं सांगितलं जात आहे. तर शिंदे यांच्यासोबत बच्चू कडू आणि दीपक केसरकर असतील असंही बोललं जात आहे. आजच्या या बैठकीत सत्तेचं सूत्रं, खाते वाटप आदी सर्व गोष्टी फायनल केल्या जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
या बैठकीनंतर दुपारी 3 वाजता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. हे दोन्ही नेते आमदारांच्या संख्याबळाचं पत्रं राज्यपालांना सादर करून सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली. तसेच उद्याच हे दोन्ही नेते मंत्रिपदाची शपथ घेणार असून हा शपथविधीचा सोहळा अत्यंत साधा असेल असंही सूत्रांनी सांगितलं.