सातारा: शिवसेनेच्या (shivsena) विरोधातील बंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांचं मोठं विधान आलं आहे. आम्ही बंड केलं. ती लढाई काही छोटी नव्हती. लढाई खूप मोठी होती. तशी कठीणही होती. एकीकडे सरकार (government), सत्ता आणि यंत्रणा होती. कोण कुठे जातोय यावर वॉच ठेवला जात होता. तर दुसरीकडे सर्वसामान्य कार्यकर्ते होते. आम्हाला दगाफटका होईल असं वाटत होतं. दगा फटक्याचा धोका होता. अशावेळी थोडं जरी इकडं तिकडं झालं असतं, दगाफटका झाला असता तर शहीदच झालो असतो, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. आम्ही बंड केल्यानंतर काय होईल… काय होईल… असं सर्वांना वाटत होतं. त्यामुळे सर्वांच्या नजरा आमच्याकडे लागल्या होत्या. पण लढाई अवघड असली तरी आम्ही त्यात यशस्वी झालो, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच सातारा येथील दरे या आपल्या गावी आले होते. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचं प्रचंड जल्लोषात स्वागत केलं. यावेळी त्यांनी आपल्या कुलदैवतेचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते तापोळा येथे आले होते. यावेळी पद्मावती मंदिरात शिंदे यांच्या स्वागतासाठी एक छोटेखानी सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी हे विधान केलं. बंड करताना थोडाजरी दगा फटका झाला असता तरी शहीद होण्याचा धोका होता, असं सांगतानाच लोकांचा आणि देवीच्या आशीर्वादाने सगळं काही सुरळीत झालं असं ते म्हणाले.
एकनाथ शिंदे हे काल रात्री सहकुटुंब सातारा येथे आपल्या मूळ गावी आले होते. यावेळी त्यांनी देवीचं दर्शन घेतलं आणि नंतर मीडियाशी संवाद साधला. मी माझी मूळं विसरलो नाही. त्यामुळे माझ्या मूळ गावी आलो आहे. जनतेचा मिळणारा भरघोस प्रतिसाद पाहून मला गहिवरून आलं आहे. माझ्या गावी आलोय. साताऱ्याचा विकास व्हावा यासाठी मी प्रयत्न करणार आहे. हे टुरिस्ट स्पॉट व्हावा यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
शिवसेना आणि भाजपची राज्यात सत्ता आहे. त्यामुळे या सरकारबद्दल कुणीही काळजी चिता करण्याचं कारण नाही. आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतोय. राज्यात सुगीचे दिवस येतील. विरोधकांना काहीही बोलू द्या. सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करतंय, असंही त्यांनी सांगितलं.
मंत्र्यांची खाती वाटप कधी होणार? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर लवकरच खाते वाटप होईल असं ते म्हणाले. कॅबिनेटच्या विस्ताराबाबतही अशीच चर्चा होती. अखेर आम्ही विस्तार केला. आता लवकरच राज्यात खातेवाटप होईल. कुणाला त्याबद्दल काळजी वाटण्याचं कारण नाही. सरकार स्थिर आहे, असं ते म्हणाले.