नागपूर : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी सेनेतून वेगळा गट स्थापन केला. राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाआघाडी नको, असं त्यांचं म्हणण आहे. यामुळं उद्धव ठाकरे यांनी त्यांना काय कमी केलं, असं भावनिक आवाहन काल केलं. यातून शिवसेनेचे सध्या दोन गट तयार झालेत. काही कार्यकर्ते हे उद्धव ठाकरे यांच्या गटात आहेत. तर काही कार्यकर्ते हे एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत. विदर्भात (Vidarbha) बहुतेक शिवसेनेचे आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत सूरतहून गुवाहाटीला गेलेत. परंतु, वर्धा, भंडारा, बुलडाणा येथील शिवसैनिक ठाकरेंच्या बाजूनं उभे असल्याचं दिसून येतंय. नागपुरातली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सर्मथनार्थ शिवसैनिकांनी व्हेरायटी चौकात मोठी घोषणाबाजी केली. मात्र, शुक्रवारी महालातील (Mahal) चितारओळ (Chitarol) परिसरात एकनाथ शिंदे यांच्या सर्मथनार्थ बोर्ड लागल्याचं दिसलं. याचा अर्थ आधे ठाकरेंकडं तर आधे शिंदेंच्या बाजूनं शिवसैनिक असल्याचं दिसून येतं.
नागपुरातही एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देणारे होर्डिंग लागले. एकनाथ शिंदे यांना मनापासून शुभेच्छा. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आत्मसात करणारे आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण पुढे घेऊन जाणारे एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा अशा मथड्याचे होर्डिंग लावण्यात आले आहेत. वीर बजरंगी सेवा संस्थानंनं हे होर्डिंग लावले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा सोडलं. त्यानंतर शिवसैनिकांनी त्यांच्या सर्मथनार्थ घोषणाबाजी केली. नेत्यांच्या गैरहजेरीत नागपुरातील कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. व्हेरायटी चौकात ठाकरे यांच्या सर्मथनार्थ नागपुरातील शिवसैनिक एकत्र आले. सेनेतील वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती फारसी दिसली नाही. शिवसेनेतील बंडाळी उफाळून आली.
शुक्रवारी सायंकाळी चितारओळ चौकात शिंदे यांच्या सर्मथनार्थ होर्डिग्स लागलेले दिसले. एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार आत्मसात करणारे नेते आहेत. आनंद दिघे यांची शिकवण पुढे घेऊन जात आहेत. त्यांच्या या पावलासाठी त्यांना शुभेच्,छा असा या होर्डिंगवर मजकूर आहे. वीर बजरंगी सेवा संस्थेतर्फे महेश झाडे पाटील यांनी हे होर्डिंग लावलेत.