मुंबई : राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळतोय. गडचिरोली, चंद्रपूर, नांदेडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. तर अनेक भागात दरड कोसळण्याच्याही घटना (landslide) घडल्या आहेत. अशावेळी राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यातील पूरस्थिती आणि आपत्कालीन परिस्थितीमुळे सहकार विभागानं हा निर्णय घेतलाय. सुमारे 8 हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका (Cooperative Society Election) पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
राज्याच्या सहकार विभागाने काढलेल्या आदेशानुसार, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार राज्यातील बहुतांश भागात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील जनजीवन तसंत वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. तसंच भारतीय हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या 13 जुलै 2022 रोजीच्या अहवालानुसार राज्यातील पूरस्थितीमुळे 1 जुलै ते 12 जुलै या कालावधीत 89 व्यक्ती आणि 181 प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील अतिवृष्टीचा मोठ्या प्रमाणात परिणाम झालेली 249 गावं, तर एकंदरीत 1368 घरांची पडझड झालेली आहे. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील अनेक जिल्ह्यात एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली आहेत. राज्यातील सर्व धरणं पूर्णपणे भरली असल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्यास त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्था आणि जनजीवनावर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.
ज्याअर्थी, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार राज्यातील निवडणुकीस पात्र असलेल्या सहकारी संस्थांची संख्या 32 हजार 743 (250 किंवा त्यापेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था वगळून) पैकी निवडणूक प्रक्रिया सुरु असणाऱ्या 7 हजार 620 इतक्या सहकारी संस्था आहेत. उक्त निवडणूक प्रक्रिया सुरु असणाऱ्या संस्थांपैकी नामनिर्देशन सुरु असणाऱ्या सहकारी संस्था 5 हजार 636 इतक्या असून, नामनिर्देशन सुरु न झालेल्या सहकारी संस्था 1 हजार 984 इतक्या आहेत. बहुतांश सहकारी संस्था या ग्रामीण भागात असून त्यांची सदस्य संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. तथापि, राज्यातील सध्याची पूरस्थिती आणि त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन, वाहतूक व्यवस्था आणि ही परिस्थित पूर्वपदावर येण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे सध्यस्थितीत निवडणुकीसाठी पात्र असणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पाडणे शक्य होणार नाही.
त्याअर्थी, राज्यात सध्यस्थितीत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेले जनजीवन आणि वाहतूक व्यवस्था, तसंच सदर परिस्थिती पूर्वपदावर येण्यास लागणारा कालावधी विचारात घेता, जास्तीत जास्त मतदारांना निवडणुकीत सहभाग नोंदवता यावा यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 क मधील तरतुदीनुसार शासनास प्राप्त झालेल्या अधिकारात 250 किंवा त्यापेक्षा कमी सदस्यसंख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था, तसंच ज्या प्रकरणी सर्वोच्च/ उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेशीत केले आहे. अशा सहकारी संस्था वगळून, राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका या आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर दि. 30 सप्टेंबर 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहेत. ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका या आदेशान्वये पुढे ढकलण्यात आलेल्या नाहीत त्यांच्या निवडणुका घेण्याबाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन निवडणुका घेण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी.