मुंबईः एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडामुळे ठाण्यात तर शिवसेनेला खिंडार पडलच आहे. पण वर्षानुवर्षांपासूनची मुंबई महापालिकाही (Mumbai Municipal corporation) शिवसेनेच्या हातून निसटतेय की काय, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र ठाण्यातील बंडखोरीचे पडसाद मुंबई महापालिकेवर तितकेसे पडले नाहीत, अशी स्थिती सध्या तरी दिसून येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी (Uddhav Thackeray) हा आशेचा किरण समजता येईल. मुंबई महापालिका निवडणुकीत उमेदवारी देण्याचा निर्णय नेहमीच ‘मातोश्री’च्या आदेशावरूनच घेतला जातो. त्यामुळे एक खासदार, पाच आमदार आणि दोन माजी नगरसेवक तसेच अगदी मोजकेच पदाधिकारी शिंदे गटात गेल्याचे चित्र आहे. मुंबईतील असंख्य पदाधिकारी आणि शिवसैनिक मात्र अजूनही ठाकरेंच्या शब्दाबाहेर गेले नसल्याचं दिसून येतंय. निवडणुकांच्या आधी ठाकरे पिता-पुत्रांनी शिवसैनिकांशी संवाद साधण्याचा धडाकाच सुरु केल्याने आगामी काळात ठाकरेंची बाजू सावरण्यासाठी हे प्रयत्न निश्चित कामी येतील, अशी शक्यता आहे. उद्धव यांच्यासाठी दिलासादायक महत्त्वाचे चार मुद्दे पुढीलप्रमाणे-
शिवसेनेच्या स्थापनेपासून मातोश्री आणि शिवसेना भवन हे तमाम शिवसैनिकांचे मुख्यालय ठरले आहे. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्ध ठकरे आणि आता आदित्य ठाकरे यांच्याकडेच मुंबईचं नेतृत्व राहिलेलं आहे. मुंबईतील कोणत्याही निवडणुकीत उमेदावारी देण्याचा निर्णय मातोश्रीवरूनच घेतला जातो. त्यामुळे ठाण्यात एकनाथ शिंदेंचं बंड झालं तरीही मुंबईतील एक खासदार, पाच आमदार, दोन माजी नगरसेवक व हाताच्या बोटांवर मोजण्याएवढे पदाधिकारी फुटले आहेत. इतर पदाधिकारी शिवसेनेतच आहेत.
मुंबई शहर आणि उपनगरात आतापर्यंत शिवसेनेचे अनेक आमदार, खासदार, नगरसेवक झाले. शिवसेना नेतेही झाले. पण पक्ष स्थापनेपासून मुंबईतील शिवसेनेचं नेतृत्व ठाकरे घराण्यानेच केले. बाळासाहेबांच्या काळात सुधीर जोशी, मनोहर जोशी, प्रमोद नवलकर, दत्ताजी नलावडे, दत्ताजी साळवी असे नेते घडले. पण ठाण्याप्रमाणे आनंद दिघे, एकनाथ शिंदे यांच्यासारखे नेते मुंबईत घडले नाहीत. किंबहुना एखाद्या नेत्याने ठाकरेंच्या पुढे जाण्याचा प्रयत्नही केला नाही.
एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतरही मुंबई शहर आणि उपनगराला तितकासा धक्का पोहोचेला दिसत नाहीये. कारण ठाकरेंचे विश्वासू अजून एकनिष्ठ असल्याचे चित्र आहे.
उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ- खासदार– अरविंद सावंत, गजानन कीर्तिकर. आमदार– आदित्य ठाकरे, रवींद्र वायकर, सुनील राऊत, सुनील प्रभू, संजय पोतनीस, रमेश कोरगावकर,प्रकाश फातर्पेकर, अजय चौधरी.82 माजी नगरसेवक– विभाग प्रमुख, उपविभागप्रमुख, महिला संघटक, शाखा प्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख इत्यादी.
शिंदे गटात शामिल कोण? खासदार– राहुल शेवाळे. आमदार– प्रकाश सुर्वे, मंगेश कुडाळकर, यामिनी जाधव, दिलीप लांडे, सदा सरवणकर. माजी नगरसेवक– यशवंत जाधव, शीतल म्हात्रे, 15 ते 20 माजी पदाधिकारी.
एकनाथ शिंदे गटाकडून मुंबई महापालिकेतही अनेकांना फोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र माजी नगरसेवक यशवंत जाधव आणि शीतल म्हात्रे वगळता अद्याप शिंदे गटात कुणी गेलेलं नाही. तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेतही टप्प्या-टप्प्याने संघटनात्मक बदल केले जात आहेत. चांदिवली विधानसभेत महाराष्ट्र नवनरि्माण सेनेमधून आलेले दिलीप लांडे शिवसेनेचे आमदार झाले. ते फुटले. त्यामुळे आता जुने शिवसैनिक सक्रिय झाले. लांडेंच्या काही शिवसैनिकांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. दादर माहीम मध्येही सदा सरवणकरांच्या बंडामुळे शिवसेनेला अद्याप फार फरक पडलेला नाही. त्यामुळे काही आजी-माजी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जय महाराष्ट्र केला असला तरीही अनेक विश्वासू आणि मूळ शिवसैनिक ठाकरेंशी एकनिष्ठ असल्याचे चित्र आहेत.