मुंबईः विलेपार्ले भागात मोठी ताकद असलेले ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते आणि माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी सोमवारी शिंदे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेसाठी हा मोठा धक्का समजला जातोय. कृष्णा हेगडे (Krushna Hegde) यांनी एवढा मोठा निर्णय का घेतला, यावर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. कृष्णा हेगडे म्हणाले, मी अजून शिवसेना सोडलेली नाही. दोन वर्षांपूर्वी मी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा मला चार आश्वासनं देण्यात आली होती. मात्र ती पूर्ण झालेली नाही.
आमच्या मतदार संघातील काही समस्यांबाबत ही आश्वासनं होती. मी दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांनी मला मोठी जबाबदारीदेखील दिली आहे, त्यामुळे मी हा निर्णय घेतलाय.
ठाकरे गटात कुणावरही माझी नाराजी नाही. शिवसेनेत जाणे ही माझीच चूक होती. सगळेच माझे मित्र आहेत. एअरपोर्ट परिसरात 1 लाख घरं, 5 लाख लोक राहतात, त्यांच्या पुनर्वसनाचं काम होतं. . विलेपार्लेतील रस्त्याच्या प्रश्न होता तसेच पक्ष संघटनवाढीत भूमिका बजावण्याची माझी इच्छा होती. या प्रमुख अपेक्षा होत्या…
एकनाथ शिंदे यांनी या अपेक्षा पूर्ण होण्याचं आश्वासन दिलंय. मी आमदार होतो. म्हाडाचा संचालक होतो. अनेक वर्षांपासून काम करतोय, त्यामुळे मी फार काही वेगळं करत नाहीये, अशी प्रतिक्रिया कृष्णा हेगडे यांनी दिली.
शिंदे गटात गेल्यानंतर खोके घेतल्याचा आरोप केला जातोय, यावर बोलताना कृष्णा हेगडे म्हणाले, खोका वगैरे काही नाही, माझ्यासोबत धोका झालाय, त्यामुळे मी शिंदे गटात जातोय…
2021 मध्ये कृष्णा हेगडे यांनी भाजपातून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्याआधी ते काँग्रेसमध्ये होते. मात्र दोन वर्षांतच त्यांनी शिवबंधनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सोमवारी शिंदे गटात प्रवेश झाला.