मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवसाचं (Last Day of Winter session) अखेरचं सत्र प्रचंड गाजलं. विधानसभेत (Assembly) आणण्यात आलेल्या आणि मंजूर करण्यात आलेल्या विद्यापीठ (University) दुरुस्ती विधेयकावरुन जोरदार खडाजंगी झाली. हे विधेयक आणण्याचं आणि घाईघाईनं मजूर करण्याचं पाप महाविकास आघाडी सरकारनं केल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी केली आहे.
आजचा दिवस महाराष्ट्राच्या लोकशाहीतला सर्वात काळा दिवस आहे. ठाकरे सरकार पळपुटं सरकार, हे आज सिद्ध झालंय, असं म्हणत फडणवीसांनी ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे. विद्यापिठाच्या कायद्यावर चर्चा सुरु असताना जाणीवपूर्वक आणि ठरवून चर्चा न करता हे विधेयक मंजूर करुन घेण्याचं पाप सरकारनं केलं, असा म्हणत फडणवीसांनी हल्लाबोल केलाय. सभागृहातून बाहेर आल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.
दरम्यान, सरकारनं केलेल्या पापमध्ये विधानमंडळाचं सचिवालयही सामील असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. आतापर्यंतच्या कुठल्याही कायद्यातून मंत्र्यांना विद्यापीठाच्या प्रशासकीय बाबतीत ढवळाढवळ करण्याची तरतूद नव्हती. विद्यापीठं राजकारणापासून दूर ठेवली गेली होती. पण उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी स्वतःला प्र-कुलपती म्हणवून घेतलं आहे. विद्यापीठाच्या प्रशासकीय आणि ऍकेडमिक बाबींमध्ये आता सरकारला हस्तक्षेप करायचा आहे, म्हणून हे केलं गेलं असल्याचा आरोपही फडणवीसांनी केला आहे.
नव्या शैक्षणिक धोरणाच्या विरोधात हे विधेयक असल्याची टीका फडणवीसांनी केली. महाराष्ट्रातील विद्यापीठांवर प्रतिगामी पद्धतीनं कब्जा करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची टीका करत फडणवीसांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केलेत. उद्या विद्यापिठाच्या खरेदीपासून ते कोणत्या कोर्सला मंजुरी द्यायची, इथपर्यंतचे सगळे अधिकार सरकारनं आपल्याकडे घेतल्याचाही दावा त्यांनी यावेली बोलताना केला. या विधेयकामुळे विद्यापीठं राजकीय अड्डा बनणार असल्याचंही ते म्हणालेत.
हे विधेयक संविधान विरोधी असून राज्यपालांकडे आम्ही याची तक्रार करणार आहोत. प्रत्येक विद्यापीठात भाजप या विधेयकाविरोधात आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिलाय. आता परीक्षांमध्ये जसे घोटाळे झाले, तसे घोटाळे होऊन उद्या डिग्री सरकारनं विकायला काढल्या तरीआम्हाला आश्चर्य वाटणार नाही, असं म्हणत फडणवीसांनी ठाकरे सरकारवर खरमरीत शब्दांत टीका केली आहे.