प्रसिद्ध ज्योतीष आणि राजकीय विश्लेषक अनिल थत्ते यांनी एक्झिट पोल जाहीर होण्याआधी महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीबद्दल काही भाकीत केली आहेत. महाराष्ट्रात महायुती की महाविकास आघाडी कोण सरस? या बद्दल त्यांचे काही अंदाज, आडाखे आहेत. महायुतीला 35 ते 40 जागा मिळतील असा माझा 100% विश्वास आहे, असं अनिल थत्ते म्हणाले. महाराष्ट्रातील जनमत सध्याच्या स्थितीत महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याच दिसत आहे. अनेक राजकीय, निवडणूक विश्लेषकांनी महाराष्ट्रात मविआ सरस ठरेल असं म्हटलय. पण अनिल थत्ते यांनी बिलकुल या उलट अंदाज वर्तवला आहे.
अनिल थत्ते यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीला बाहेरुन पाठिंबा दिला, त्याचा फायदा होईल का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, “माझ्या मते मनसे ना जमेत ना खर्चात. मनेसच्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केल्याच दिसलं नाही. माझं बऱ्यापैकी लक्ष होतं. मित्रांशी चर्चा करायचो. स्टेज शो व्यतिरिक्त, राज ठाकरेंच्या सभेव्यतिरिक्त मनसे कार्यकर्ते दिसले नाहीत. ठाणे, कल्याण-डोंबिवलीत मी राहतो, मला मनसे कार्यकर्त्यांनी मनापासून काम केल्याचं दिसलं नाही. मनसेचा फायदा होणार नाही. 2019 साली विरोधात होते, तेव्हा फायदा झाला नाही. आताही फायदा होईल, असं वाटत नाही”
वंचित बद्दल काय म्हटलं?
वंचित फॅक्टर किती प्रभावी ठरेल प्रश्नावरही अनिल थत्ते यांनी उत्तर दिलं. “मागच्यावेळी त्यांच्यामुळे काही जागा गेल्या होत्या. यावेळी त्यांनी पोरखेळ केला. प्रकाश आंबेडकरांची क्रेडिबलिटी कमी झाली. कधी शिवसेना, कधी काँग्रेस, कधी राष्ट्रवादी नको, युती मोडायचीच काँग्रेस आघाडीमध्ये जायच नाही, हे ठरवलेलं. आपला उपयोग भाजपाला कसा होईल हे त्यांनी सिद्ध केलं. माझ्या काही दलित मित्रांशी बोललो, प्रकाश आंबेडकरांनी क्रेडिबलिटी घालवली, ते फार मोठ्या प्रमाणात नुकसान करु शकणार नाहीत” असं अनिल थत्ते यांचं निरीक्षण आहे.