रवी खरात
मुंबई : रात्री उशिरा प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. गौतम अदानी स्वत: शरद पवार यांच्या मुंबईतील सिलव्हर ओक निवासस्थानी गेले होते. शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात बंद दाराआड काहीवेळ चर्चा झाली. गौतम अदानी यांनी शरद पवार यांची भेट का घेतली? या भेटीमागे काय कारण आहे? ते अजून स्पष्ट नाहीय. या भेटीमागे विविध अर्थ लावले जात आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थिती गौतम अदानी हे भाजपाच्या जवळचे मानले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत गौतम अदानी यांचे चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत.
शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात सुद्धा जुने मैत्रीपूर्ण संबंध आहेत. अदानी यांनी पहिल्यांदा शरद पवार यांची भेट घेतलेली नाही. यापूर्वी सुद्धा गौतम अदानी यांनी शरद पवार आणि मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. सध्या देशात एअरपोर्ट बंदरापासून वेगवेगळ्या क्षेत्रात अदानी समूह वेगाने विस्तारत आहे. गौतम अदानी यांच्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अनेकदा निशाणा साधला आहे. सध्या इंडियात आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरु आहे. अशावेळी अदानी आणि पवारांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
धारावी पूनर्विकास हे भेटीच कारण का?
अदानी समूह धारावीचा पूनर्विकास करणार आहे. त्या विरोधात अलीकडेच ठाकरे गटाने मोठा मोर्चा काढला होता. अदानी आणि शरद पवार भेटीमागे हे एक कारण असू शकते.
‘अदानी हा काय कळीचा मुद्दा नाही’
काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे. हा विषय आमचा नाही. या संदर्भात पवार साहेबांना विचारलं तर बरे होईल. आम्ही थोडी खिडकीला कान लावून बसलो आहोत” अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली. “भेट झाली पण यात महाविकास आघाडीचा संबंध काय? अदानी हा काय कळीचा मुद्दा नाही, धारावी प्रकल्पाच्या ज्या अटी-शर्ती आहेत, त्याला आमचा विरोध आहे. कोण कोणाला भेटतय यावर महाविकास आघाडीचं भविष्य नाही, शरद पवार आणि अदानी यांचे फार जुने संबंध आहेत” असं संजय राऊत म्हणाले. “मला नाही माहित. पण त्यांनी अनेकांना काल भेटी दिल्यात” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.