सांगली : सांगली लोकसभा निवडणुकीचं मतदान काल (23 एप्रिल) पार पडलं. यावेळी मतदान करण्यासाठी गेलेल्या सांगली महापालिकेच्या महापौर संगीता खोत यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण महापौर संगीता खोत यांनी मतदाना करण्यासाठी कमळाचे चित्र असलेली साडी नेसली होती. या प्रकारामुळे संगीता खोत यांच्याविरोधात महात्मा गांधी पोलिस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापौर संगीता खोत या काल दुपारी माणिकनगर येथील केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी संगीता खोत यांनी कमाळाचे चित्र असलेली साडी नेसली होती. भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हाचा त्यांनी प्रचार केला, अशी तक्रार काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी प्रशासनाकडे केली. त्यानंतर निवडणूक विभागाने या तक्रारीची दखल घेत गांधीनगर पोलीस ठाण्यात महापौर संगीता खोत यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा रात्री दाखल केला.
सांगीता खोत या भाजपच्या सांगलीतील नेत्या असून, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या विद्यमान महापौर आहेत.
सांगलीत तिरंगी लढत
सांगलीत यंदा लोकसभेसाठी तिरंगी लढत पाहायला मिळते आहे. भाजपकडून संजयकाका पाटील, आघाडीकडून स्वाभिमानीच्या तिकिटावर विशाल पाटील, तर वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर रिंगणात आहेत. तिघेही तोडीस तोड उमेदवार असल्याने सांगलीत कोण बाजी मारणार, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.