मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शरद पवारांच्या माघारीचं पहिलं कारण समोर आलं आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे मावळमधून लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे पार्थ पवार यांच्या मावळमधून लढण्याच्या हट्टापोटी शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतल्याची चर्चा आहे. शिवाय, अजित पवारही सुपुत्र पार्थ पवार यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. या सर्वांचा परिपाक म्हणून शरद पवार यांनी एकाच कुटुंबातील तिघेजण लोकसभेच्या रिंगणात नको, हे कारण देत माढ्यातून माघार घेत वादावर पडदा टाकला.
पार्थ पवार यांचा हट्ट आणि पार्थ यांच्यासाठी अजित पवार यांचा आग्रह हे पाहता कुटुंबांअंतर्गत कलह वाढण्याच्या आधीच शरद पवार यांनी माढ्याच्या रिंगणातून माघार घेतली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
‘या’ दोन निकषांवर पार्थला मावळमधून उमेदवारी : शरद पवार
माढ्यातून पवारांची माघार, पार्थच्या उमेदवारीचीही घोषणा
मी स्वत: लोकसभा निवडणूक न लढता नव्या पिढीला उमेदवारी देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली आणि सोबतच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देणार असल्याचीही घोषणा केली. मात्र, पार्थ पवार यांच्या उमेदवारीसाठी शरद पवार यांनी दोन निकष सांगितले.
कोणत्या दोन निकषांवर पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी?
पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देण्याबाबत शरद पवार म्हणाले, “आमच्या कुटुंबीयांमधील सुप्रिया सुळे उमेदवारी करणार आहेत, तर पार्थ पवार यांच्या उमेदवारीसंदर्भात शेकापचे जयंत पाटील यांनी त्यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवाराला संधी द्यावी, असा विचार आहे. त्यामुळे मी लोकसभा निवडणूक न लढता नव्या पिढीला पार्थला उमेदवारी देण्याच्या निर्णयापर्यंत आम्ही आलो आहोत.”
तसेच, लोकमान्यता आणि निवडणूक येण्याची क्षमता या निकषांवर आम्ही उमेदवारीचा निर्णय घेतो, असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार यांची उमेदवारी अप्रत्यक्षरित्या जाहीरच करुन टाकली.