पुणे : संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार कोण, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. भाजपने पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी घोषित केल्यानंतर, काँग्रेसचा उमेदावर कोण असणार, याची उत्सुकता आहे. मात्र, काँग्रेसकडून अद्याप पुण्यात उमेदवारच घोषित करण्यात आला नाही. पुण्यातून काँग्रेसकडून पाच नावांची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातील काही जणांनी स्पष्ट नकार कळवला असला, तरी त्यांच्या नावाची चर्चा मात्र जोरात सुरु आहे.
पहिलं नाव : प्रवीण गायकवाड
पुण्यातून लोकसभा लढवण्यासाठी काँग्रेसचा उमेदवार म्हणून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचे नाव स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना सूचवलं होतं. मात्र, प्रवीण गायकवाड यांच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब झालेला नाही. शिवाय, काँग्रेसकडूनच इतर नावं पुण्याच्या जागेसाठी चर्चेत आल्याने प्रवीण गायकवाड यांचं नाव मागे पडलं आहे.
दुसरं नाव : अरविंद शिंदे
अरविंद शिंदे हे पुणे महानगरपालिकेत नगरसेवक असून, काँग्रेसचे महापालिका गटनेते आहेत. पुण्यातील त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. अरविंद शिंदे यांचे नाव पुणे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून पुढे आले आहे. मात्र, त्यांच्याही नावावर अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. मात्र, अरविंद शिंदे हे प्रबळ दावेदार काँग्रेसकडून असल्याची माहिती आहे.
तिसरं नाव : पृथ्वीराज चव्हाण
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नावही पुणे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून चर्चेत आहे. अत्यंत स्वच्छ प्रतिमेचे नेते म्हणून पृथ्वीराज चव्हाणांची ओळख आहे. सुशिक्षित म्हणवल्या जाणाऱ्या पुणेकरांना पृथ्वीराज चव्हाणांसारखा नेता आपलासा वाटेल, अशी धारणा काँग्रेसची आहे. मात्र, पुण्यातून लढण्यास स्वत: पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्ट नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
चौथं नाव : हर्षवर्धन पाटील
हर्षवर्धन पाटील हे पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे काँग्रेसचे आमदार आहेत. त्यांचे नावही पुणे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून चर्चेत आहे. मात्र, हर्षवर्धन पाटील आणि पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फारसे पटत नाही. अगदी थेट अजित पवारांशीच त्यांचा छत्तीसचा आकडा असल्याची चर्चा आहे. दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी पुण्यातून लढण्यास स्पष्ट नकार कळवला आहे.
पाचवं नाव : मोहन जोशी
काँग्रेसकडून मोहन जोशी यांच्या नावाचीही चर्चा आहे. मोहन जोशी हे काँग्रेसचे आमदार असून, पुण्यात त्यांचा जनसंपर्क आहे. शिवाय, बापटांसारख्या नेत्याला ते आव्हानही देऊ शकतात, अशी भावना काँग्रेसची आहे. मोहन जोशी यांच्या नावावर काँग्रेसकडून गांभिर्याने विचारही केला जातो आहे.
पुण्यात आयात उमेदवार देण्यास काँग्रेसमधील काही नेत्यांचा विरोध आहे. त्यामुळे पुण्यात मोहन जोशी आणि अरविंद शिंदे यांच्या नावार अधिक गांभिर्याने विचार होणार आहे. पुण्यातून काँग्रेसकडून कोण लढणार, हे आज संध्याकाळपर्यंतच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.