उल्हासनगर (ठाणे) : माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उल्हासनगरच्या सभेत रिकाम्या खुर्च्या पाहावयास मिळाल्या. मंगळवारी (9 एप्रिल) संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास उल्हासनगरच्या गोल मैदानात शरद पवार यांची सभा होती. मात्र, पवारांच्या सभेकडे लोकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसले.
कल्याण लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकून बाबाजी पाटील रिंगणात आहेत. बाबाजी पाटील यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार ज्योती कलानी यांनी या सभेचे आयोजन केले होते. या सभेसाठी संध्याकाळी 6 वाजल्यापासून पवारांना ऐकण्यासाठी लोक सभास्थळी येऊन बसलेले होते. मात्र पवार यांना सभास्थळी यायला उशीर झाला. या दरम्यान अनेक नेत्यांची भाषणे झाली आणि त्यानंतर पवार 9 वाजता बोलायला उभे राहिले. मात्र पवारांचे भाषण लांबताच लोक उठून जाऊ लागले. त्यामुळे सभास्थळी अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या.
या प्रकारामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघातील आघाडीच्या पहिल्या मोठ्या सभेचा फज्जा उडल्याचे चित्र पाहायला मिळाले.
कल्याणमध्ये कुणाची लढत?
कल्याणमधून शिवसेना-भाजपकडून मंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे रिंगणात आहेत, तर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीचे नेते बाबाजी पाटील रिंगणात आहेत. या मतदारसंघातून श्रीकांत शिंदे विद्यमान खासदार आहेत. 2014 साली पहिल्यांदा निवडणूक लढणारे श्रीकांत शिंदे मोठ्या फरकाने विजयी झाले होते. एकनाथ शिंदे यांच्या कामामुळे ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे यंदा कल्याणमधून फारशी चुरस नसल्याचेच चित्र आहे.