मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील सडेतोड, बेधडक आणि रोखठोक व्यक्तिमत्व. आपल्या आक्रमकपणामुळे विरोधकांना धडकी भरवणाऱ्या नारायण राणे यांनी ‘No Hold Barred : My Years in Politics’ नावाचं आत्मचरित्र लिहिलं आहे. या आत्मचरित्रातून नारायण राणेंनी वादळी खुलासे केले आहे.
नारायण राणे यांनी 2005 मध्ये शिवसेनेला रामराम ठोकला, तर राज ठाकरे यांनी 2006 मध्ये जय महाराष्ट्र केला. या दरम्यान राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्या मैत्रीबद्दल नेहमीच बोलले जायचे. राणेंनी आपल्या आत्मचरित्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दलही खळबळजन गौप्यस्फोट केले आहेत.
पहिला गौप्यस्फोट
शिवसेनेतील अंतर्गत राजकारणाला कंटाळून राज ठाकरे यांनी 2006 साली शिवसेनाल ‘जय महाराष्ट्र’ केला. महाराष्ट्रभर दौरा करुन, राज ठाकरे यांनी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ नावाचा पक्ष स्थापन केला. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडणं, ही महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत मोठी घटना होती. याचे कारण राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे व्यक्ती होतेच, मात्र ‘ठाकरे शैली’चे खरे वारसदार म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाई.
दुसरीकडे राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्याआधीच शिवसेनेतील अत्यंत आक्रमक नेते नारायण राणे यांनी शिवसेना सोडली होती. नारायण राणे यांचा पक्षातील मान-सन्मान आणि पदांवरुन वाद होता. मात्र, ज्यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली, त्यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्याशी संपर्क साधला होता.
आपण एकत्र येऊन नवीन पक्ष स्थापन करु, असं निमंत्रण राज ठाकरेंनी आपल्याला दिलं होतं, असा खळबळजनक गौप्यस्फोट नारायण राणे यांनी आत्मचरित्रात केला आहे. मात्र, राज ठाकरेंचं निमंत्रण नारायण राणेंनी नाकारलं. “ठाकरेंची कामाची पद्धत माहित असल्यानं, सोबत काम करणार नाही.” असे नारायण राणेंनी राज ठाकरेंना कळवलं.
दुसरा गौप्यस्फोट
राज ठाकरे यांनी 2005 साली शिवसेना सोडली, त्यावेळी शिवसेनेतील बाळा नांदगावकर, शिशीर शिंदे, प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते सोबत आले. राज ठाकरे यांनी शिवेसना सोडण्याआधी राज्यभर दौरा करुन, आपल्याला प्रतिसाद कसा मिळेल, याचा अंदाज घेतला होता. याच अनुशंघाने नारायण राणे यांनी त्यांच्या आत्मचरित्रात राज ठाकरेंबद्दल दुसरा गौप्यस्फोट केला आहे.
राज ठाकरेंसोबत शिवसेनेतले जवळपास 38 आमदार होते. राज ठाकरेंनी शिवसेना सोडली, त्यावेळी हे 38 आमदारही पक्ष सोडणार होते. मात्र, प्रत्यक्षात 13 आमदारांनी सोडलं, असे नारायण राणेंनी आत्मचरित्रात म्हटले आहे.
राणे आणि राज ठाकरे… दोघांचेही स्वतंत्र पक्ष
नारायण राणे आणि राज ठाकरे हे दोघेही मूळचे ‘कट्टर शिवसैनिक’. दोघांची पक्ष सोडण्याची कारणं वेगवेगळी असली, तरी पुढे जाऊन महाराष्ट्रातील राजकारणात मात्र त्यांनी आपला जम सारखाच बसवला. त्यात राज ठाकरे सरस ठरले, कारण त्यांच्या मागे ‘ठाकरे’ नावाचा वारसा होता. राज ठाकरेंनी मनसेच्या माध्यमातून राज्यातील महत्त्वाचा पक्ष म्हणून ओळख निर्माण केली. नारायण राणे मात्र काही काळ धडपडत राहिले.
नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, मूळचे ‘शिवसैनिक’ असलेल्या नारायण राणेंचा आक्रमकपणा काँग्रेसमध्ये बसणारा नव्हता. त्यामुळे पुढे नारायण राणे यांनी काँग्रेसलाही सोडचिठ्ठी देत, ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ स्थापन केला आहे. एकंदरीत राज ठाकरे आणि नारायण राणे हे दोघेही ‘माजी शिवसैनिक’ आता स्वतंत्र पक्षाचे प्रमुख आहेत. मात्र, दोघांमधील मूळचा ‘शिवसैनिकी आक्रमकपणा’ अजूनही कायम आहे.