Ashok Chavavn | राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण भाजपामध्ये कुठल्याहीक्षणी प्रवेश करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. मुंबईतील नरिमन पॉइंट येथील भाजपा कार्यालयात लगबग वाढली आहे. तिथे जय्यत तयारी सुरु आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील भाजपा कार्यालयात येत असल्याची माहिती आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा हे देखील पोहोचले आहे. या सगळ्या घडामोडी मोठ काहीतरी घडणार असल्याचे संकेत देत आहे. अशोक चव्हाण हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठ नाव आहे. त्यांना राजकारणाच बाळकडू घरातूनच मिळालेलं. त्यांचे वडील शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांच्यानंतर अशोक चव्हाणांना 2008 साली मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली. 2008मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडीत अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली.
अशोक चव्हाण मराठवाड्यातील काँग्रेसचे एक मोठे नेते आहेत. नांदेड जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांची चांगली पकड आहे. आता असा नेता भाजपाच्या गळाला लागला, तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीआधी भाजपाच बळ कित्येक पटीने वाढले. अशोक चव्हाण हे भाजपाच्या वाटेवर आहेत,. अशी मागच्या काही दिवसांपासून चर्चा होती. ती आता खरी ठरेल असं दिसतय. अशोक चव्हाण यांनी आज विधानभवनात येऊन राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. त्यानंतरच या सगळ्या चर्चा सुरु झाल्या.
राहुल नार्वेकरांना का भेटले?
अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी राहुल नार्वेकर यांची भेट घेतली असल्याच बोलल जात आहे. अशोक चव्हाण हे नॉट रिचेबल झाले आहेत. त्यांचा फोन लागत नाहीय. त्यामुळे विविध राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलय. भाजपाच्या मुंबई कार्यालयाबाहेर अनेक दिग्गज नेते उपस्थित आहेत. तिथे काही माजी नगरसेवकांचा भाजपात पक्षप्रवेश सुरु आहे.