मुंबई : काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अशोक चव्हाण आज भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाण यांनी स्वत: यावर शिक्कामोर्तब केलय. काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भेटून त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच म्हणजे कालच त्यांचा भाजपा प्रवेश होईल अशी चर्चा सुरु झाली होती. पण काल त्यांनी या वृत्ताच खंडन केलं होतं. आता अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये आज प्रवेश करणार असल्याच म्हटलं आहे. भाजपा प्रवेशाआधी त्यांनी मीडियाच्या प्रतिनिधीशीं संवाद साधला.
“आज मी माझ्या राजकीय आयुष्याची नव्याने सुरुवात करतोय. आज मी रीतसर भाजपात प्रवेश करणार आहे. दुपारी 12 ते 12.30 च्या दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहे” असं अशोक चव्हाण म्हणाले. अन्य जिल्ह्यातील काही संभाव्य लोक माझ्यासोबत प्रवेश करतील असं ते म्हणाले. तुमच्यासोबत किती आमदार प्रवेश करणार? यावर एका वाक्यात अशोक चव्हाणांनी उत्तर दिलं. ‘मी कोणालाही बोलावलेलं नाही’. काँग्रेसबद्दल विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, ‘तो चॅप्टर ओव्हर झालाय. मी नवीन सुरुवात करतोय’
आजच पक्षप्रवेश का?
अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्राच मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. मराठवाडा खासकरुन नांदेड जिल्ह्यातील ते एक वजनदार नेते आहेत. अशा नेत्याची सोडचिठ्ठी हा काँग्रेसला धक्का आणि भाजपाची ताकद वाढवणारा आहे. अशोक चव्हाण यांना भाजपा प्रवेश नंतर होईल असं बोलल जात होतं. पण आगामी राज्यसभा निवडणुकीमुळे आजच त्यांचा पक्षप्रवेश होतोय. भाजपाकडून अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवल जाण्याची दाट शक्यता आहे.