विधान परिषदेचे माजी आमदार कपिल पाटील यांनी आज सकाळी शिवतीर्थवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. “महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थिती गेल्या काही दिवसात बिघडलेली दिसते. महाराष्ट्रातील सोशल फॅब्रिक तुटता कामा नये. महाराष्ट्राचा एकोपा, सलोखा कायम राहिला पाहिजे. यासाठी काम करण्याची आवश्यकता आहे. हा सलोखा साधण्याची ज्यांची ताकद आहे, अशी थोडी लोकं महाराष्ट्रात आहेत, राज ठाकरे त्यापैकी एक आहेत, म्हणून मी राज ठाकरेंना भेटायला आलो” असं कपिल पाटील म्हणाले. ते विधान परिषदेचे माजी आमदार आहेत.
“अनेक नेत्यांना मी भेटणार आहे. राजकारण बाजूला राहू दे, निवडणुका येतील-जातील. राज्यात, समाजा-समाजात वितुष्ट येता कामा नये. अकारण लोक भडकवत आहेत. वातावरण बिघडू नये, यासाठी सगळ्यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. म्हणून मी राज ठाकरे यांना भेटायला आलो. त्यांनी पुढाकार घ्यावा, अन्य नेत्यांना सुद्धा मी भेटणार आहे. महाराष्ट्राचा वारसा हा फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आहे. तो एकोपा, सलोखा कायम राहिला पाहिजे” असं कपिल पाटील म्हणाले.
‘राजकारण माझ्यासाठी दुय्यम’
“मी नेहमीच सामाजिक प्रश्नांवर काम करत आलोय. मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. राजकारण माझ्यासाठी दुय्यम आहे. सामाजिक प्रश्नांसाठी वंचितांच्या मुद्दावर मी कायम सर्व नेत्यांना भेटत असतो, बोलत असतो समाजातील घटकांशी संवाद साधत असतो” असं कपिल पाटील म्हणाले.