मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात एका मतदारसंघाची खूप चर्चा सुरु आहे, तो म्हणजे कागल. कोल्हापुरातील कागल विधानसभा मतदारसंघातून सध्या हसन मुश्रीफ आमदार आहेत. हसन मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहेत. महायुतीकडून उमेदवारी त्यांनाच मिळणार हे जवळपास निश्चित आहे. पण कागलची लढाई हसन मुश्रीफ यांच्यासाठी सोपी नसेल. तिकीटाची शक्यता मावळल्याने समरजीत घाटगे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी हाती घेतली. समरजीत मागच्या काही वर्षांपासून या मतदारसंघात विधानसभेची तयारी करत आहेत. हसन मुश्रीफ यांच्यासमोर त्यांचे आव्हान आहेच. पण आता संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक सुद्धा हसन मुश्रीफ यांच्या विरोधात जाण्याच्या तयारीत आहेत.
संजय मंडलिक हे शिवसेना शिंदे गटात आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांचा पराभव झाला होता. आता कोल्हापुरातील कागल विधानसभा मतदारसंघातून वीरेंद्र मंडलिक यांनी विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे महायुतीसमोरच्या अडचणी वाढू शकतो. या निमित्ताने मंडलिक कुटुंबातील मतभेद सुद्धा समोर आले आहेत.
संजय मंडलिक यांचं म्हणणं काय?
कागल विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरूनच मंडलिक पिता-पुत्रांमध्येच वेगवेगळी मत आहेत. एकाबाजूला वीरेंद्र मंडलिक हे निवडणूक लढवण्याची तयारी करतायत. दुसऱ्याबाजूला माजी खासदार संजय मंडलिक मात्र हसन मुश्रीफ यांच्या व्यासपीठावर दिसले. “राज्यात पुन्हा महायुतीचा शासन यावं आणि त्यात हसन मुश्रीफ असावेत. त्यासाठी अत्यंत ताकदीने हसन मुश्रीफ यांना मदत करा” मौजे सांगाव येथील जाहीर सभेत संजय मंडलिक यांनी हे वक्तव्य केलं. संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी महायुतीकडून उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे. हसन मुश्रीफ यांनी लोकसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे मदत केली नव्हती असाही वीरेंद्र मंडलिक यांनी आरोप केला होता.