महाराष्ट्र नवनिर्माण सेना ते वंचित बहुजन आघाडी असा प्रवास करणारे पुण्याचे वसंत मोरे लवकरच एक नवीन पक्षात प्रवेश करणार अशी शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. त्यांनी पुण्यातून वंचितकडून तिकीट घेऊन लोकसभेची निवडणूक लढवली होती. पण त्यांचा दारुण पराभव झाला. आता भविष्याच्या दृष्टीने ते लवकरच एका नवीन राजकीय पक्षात प्रवेश करु शकतात. वसंत मोरे हे पुण्यातील मनसेचे प्रमुख नेते होते. पण पुण्यातील मनसेच्या अन्य पदाधिकाऱ्यांबरोबरच्या मतभेदांमुळे काही महिन्यांपूर्वी त्यांनी मनसे सोडली.
मनसे सोडल्यानंतर ते महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीच तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यासाठी त्यांनी शरद पवार, संजय राऊत यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. पण मविआने पुण्यातून रवींद्र धंगेकर यांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे अखेर त्यांनी प्रकाश आंबडेकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करुन तिकीट मिळवलं. पण त्यांना लोकसभा निवडणुकीत छाप उमटवणारी कामगिरी करता आली नाही. आता वसंत मोरे लवकरच नवीन पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा सुरु झाली आहे.
भेटीमागे हेतू काय?
वसंत मोरे आज दुपारी 12 वाजता मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. ही सदिच्छा भेट असल्याच बोलल जातय. उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यामागे पुण्यातून विधानसभेच तिकीट मिळवण्याची वसंत मोरेंची रणनिती असू शकते.