मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा (Maharashtra Cabinet Expansion) उद्या (16 जून) विस्तार होणार आहे. दोन ते तीन महिन्यांवर विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Elections) येऊन ठेपल्याने, शेवटच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अत्यंत महत्त्व आलं आहे. नव्याने कुठल्या मंत्र्यांचा समावेश आणि कुठल्या विद्यमान मंत्र्याला बढती मिळते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यात आणखी एक महत्त्वाचे लक्षवेधी ठरणार आहे ते शिवसेनेचे कितीजण मंत्रिपदाची शपथ घेणार आणि कोणती नवी खाती मिळणार.
शिवसेनेला उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात एकच कॅबिनेट मंत्रिपद मिळणार आहे. राष्ट्रवादीतून नुकतेच शिवसेनेत आलेल्या बीडमधील जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेच्या कोट्यातील एकमेव कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याचे जवळपास निश्चित मानलं जात आहे.
त्याचसोबत, शिवसेनेला एक राज्यमंत्रिपदही मिळणार आहे. एकच राज्यमंत्रिपद असल्याने, शिवसेनेत मोठ्या प्रमाणात लॉबिंग सुरु झाली आहे. यात विशेषत: तानाजी सावंत, राजेश क्षीरसागर, उदय सामंत आणि अनिल परब यांच्यात चुरस आहे. या चारही आमदारांनी राज्यमंत्रिपदासाठी लॉबिंग सुरु केली आहे.
तानाजी सावंत ( आमदार, विधान परिषद ) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पंढरपूर दौऱ्याचे आयोजन आणि शक्तिप्रदर्शन, तसेच उस्मानाबाद आणि सोलापूरमधील दुष्काळी गावांत आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याचे आयोजन.
राजेश क्षीरसागर (आमदार, विधानसभा) : कोल्हापूर- हातकणंगले लोकसभा मतदार संघातून संजय मंडलिक आणि धैर्यशील माने पक्षाच्या खासदारांचा पहिल्यांदा विजय. कोल्हापूर जिल्ह्यात पक्षाचे सहा आमदार, तरीही जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्थान नाही ही कोल्हापूरमधील आमदारांची जुनी खंत.
उदय सामंत (आमदार, विधानसभा) : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा मुलगा निलेश याचा सलग 2014-2019 लोकसभा निवडणुकीत पराभव. यंदा शिवसेनेचे विनायक राऊत यांना जवळपास सव्वा लाखाहून अधिक मताधिक्य.
अॅड. अनिल परब (आमदार आणि गटनेते, विधान परिषद) : नारायण राणे यांचा वांद्रे (पूर्व) खेरवाडी विधानसभा पोटनिवडणुकीत पराभव, मुबंई महापालिका निवडणुकीत पक्षाची व्यूहरचना, युतीत मतभेदांच्या काळात भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर, लोकसभा निवडणुकीत गजानन कीर्तिकर यांच्या विजयासाठी व्यूहरचना आखणी.