पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांची प्रकृती गंभीर असून, स्थिर असल्याची माहिती गोव्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. मात्र, गोव्यातील आमदारांचं पर्रिकरांच्या प्रकृतीबद्दल एकमत होताना दिसत नाही. मनोहर पर्रिकरांची प्रकृती गंभीर असल्याचं मायकल लोबोंनी सांगितलंय, तर दुसरीकडे निलेश कॅब्रियल मात्र पर्रिकर उपचारांना प्रतिसाद देत असून ते लवकरचं बरे होतील असं सांगत आहेत. शनिवारी दिवसभर गोव्यामध्ये पर्रीकरांच्या तब्येतीवरुन प्रचंड अफवा पसरल्या होत्या. अखेर गोवा मुख्यमंत्री कार्यालयाने पुढे येत पर्रिकरांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली.
मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल होताच काँग्रेसकडून सत्तास्थापनेचा दावा
जवळपास गेल्या एक वर्षापासून पर्रिकर आजाराशी झुंज देत आहेत. पर्रिकरांवर अगोदर अमेरिकेत उपचार करण्यात आले आणि त्यानंतर दिल्लीतील एम्समध्येही त्यांच्यावर उपचार झाले. काही दिवसांपूर्वी ते नियमित तपासणीसाठी दिल्लीला जाऊन आले आहेत. त्यानंतर एंडोस्कोपीसाठी त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आजारपणासोबतच ते गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाचाही कार्यभार सांभाळत आहेत. अखेरच्या श्वासापर्यंत गोवेकरांची सेवा करणार असल्याचं पर्रिकरांनी यापूर्वीच जाहीर केलंय.
With respect to some reports in media, it is hereby stated that Hon’ble Chief Minister @manoharparrikar‘s health parameters continues to remain stable.
— CMO Goa (@goacm) March 16, 2019
मनोहर पर्रिकरांवर कुठे आणि कधी उपचार?
• मनोहर पर्रिकरांना ऍडव्हान्स स्टेजचा स्वादुपिंडाचा कॅन्सर
• मुंबईतील लीलावती हॉस्पिटल, गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार
• 4 फेब्रुवारी, 2018 पर्रीकरांची प्रकृती खालवली होती
• 4 फेब्रुवारी, 2018 रोजी पर्रिकरांना गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले
• 5 फेब्रुवारी 2018 ला मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले
• 10 ऑगस्टला कॅन्सरच्या उपचारांसाठी पर्रिकर अमेरिकेत
• सप्टेंबरमध्ये अमेरिकेहून भारतात परतले
• सप्टेंबरमध्ये दिल्लीतील AIIMS मध्ये उपचारासांठी दाखल
• 27 सप्टेंबर रोजी पर्रिकरांना स्वादुपिंडाचा कॅन्सर झाल्याचे जाहीर
• उपचारानंतर 14 ऑक्टोबरला ते गोव्यात परतले