राष्ट्रवादीचे नेते बाजार बुणगे, आघाडी सरकार पांढऱ्या पायाचे, बलात्कारी; पडळकर, दरेकर बरसले

| Updated on: Apr 14, 2021 | 12:38 PM

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत आरोप-प्रत्यारोपाच्या चांगल्याच फैरी झडत आहेत. (gopichand padalkar and pravin darekar hit out maha vikas aghadi)

राष्ट्रवादीचे नेते बाजार बुणगे, आघाडी सरकार पांढऱ्या पायाचे, बलात्कारी; पडळकर, दरेकर बरसले
gopichand padalkar
Follow us on

पंढरपूर: पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत आरोप-प्रत्यारोपाच्या चांगल्याच फैरी झडत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे नेते गोपीचंद पडळकर आज अक्षरश: ठाकरे सरकारवर तुटून पडले. राज्यातील राष्ट्रवादीचे नेते बाजारबुणगे आहेत. आघाडी सरकार पांढऱ्या पायाचे असून बलात्कारी आहे, असा घणाघाती हल्लाच पडळकर आणि दरेकरांनी आज केला. (gopichand padalkar and pravin darekar hit out maha vikas aghadi)

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमदेवार समाधान आवताडे यांचा प्रचार करण्यासाठी प्रवीण दरेकर आणि गोपीचंद पडळकर आज पंढरपुरात आले होते. यावेळी या दोन्ही नेत्यांनी आवताडे यांचा प्रचार करताना ठाकरे सरकारवर हल्ला चढवलाच परंतु, राष्ट्रवादीवरही घणाघाती टीका केली. पडळकर यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच भाजपची भूमिका भगीरथ भालकेंच्या विरोधात नसल्याचं स्पष्ट केलं. राज्यातील आघाडी सरकार हे विश्वासघाताने आलं आहे. त्याच्याविरोधात आमची भूमिका आहे, असं पडळकारांनी सांगितलं. त्यानंतर पडळकर ठाकरे सरकारवर जोरदार तुटून पडले.

कोरोनाच्या काळात सामान्य जनतेचं कंबरडे मोडले. एक वर्षे झाले तरी या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारने काहीही केलं नाही. काल लॉकडाऊन जाहीर केला. हा लॉकडाऊन जाहीर करताना थातूरमातूर योजना जाहीर केल्या. त्याही जुन्याच योजना आहेत. नवीन काहीच नाही. या सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असं सांगतानाच या मतदारसंघात सर्व मंत्री येत आहेत. पण त्यांना शेतकऱ्यांचे झालेले नुकसान दिसत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

बलात्कारी सरकार

राज्यातील सरकार हे बलात्कारी सरकार आहे. गुन्हेगारांचं सरकार आहे. गेल्या दोन महिन्यात टीव्हीवर या सरकारच्या काळ्याधंद्यांच्या बातम्यांशिवाय एकही बातमी दिसत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

कारखाना घशात घालायचा आहे

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं कुटुंब पंढरपुरात येत आहे. अख्ख पवार कुटुंब पंढरपुरात येत आहे. त्यांना तुमचं आणि निवडणुकीचं काहीही पडलं नाही. पवार कुटुंबाचा डोळा विठ्ठल कारखान्यावर आहे. हा कारखाना त्यांना घशात घालायचा आहे. रोहित पवारांनी आधीच एक कारखाना ताब्यात घेतला आहे. अनेक कारखाने त्यांनी कवडीमोल भावात घेतले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

भाजप जातीयवादी कशी?

भाजपमध्ये सर्वाधिक आमदार ओबीसी आणि मराठा समाजाचे आहेत. तरीही हे सरकार म्हणतंय, भाजप जातीयवादी आहे. अठरापगड जातीचे लोक भाजपमध्ये असताना भाजप जातीयवादी कशी? असा सवालही त्यांनी केला. गरीबांच्या मुलाला भाजपने आमदार, मंत्री केले. सदाभाऊ खोत आणि महादेव जानकर यांच्यासह अनेक उदाहरणे आहेत, असंही ते म्हणाले. भाजपही कार्यकर्त्यांची पार्टी आहे.

मराठा आरक्षण नाहीच

ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाचा बट्ट्याबोळ केला आहे. या सरकारने मराठा आरक्षण दिलं नाही. आरक्षणाच्या बाबतीत हे सरकार पांढऱ्या पायाचे आहे, असा घणाघाती हल्ला त्यांनी केला.

निवडणूक झाल्यावर राज्यात भाजपचं सरकार

ठाकरे सरकारकडून आम्हाला प्रचंड अपेक्षा होता. हातावर पोट असणाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये हे सरकार देईल असं वाटत होतं. परंतु या सरकारने काहीच दिलं नाही. जुनीच दारू नव्या बाटलीत टाकून दिली. जुन्याच योजना नव्याने आणल्या सारख्या दाखवल्या, असं सांगतानाच या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. ही निवडणूक झाल्यावर राज्यात भाजपचं सरकार येईल, असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. (gopichand padalkar and pravin darekar hit out maha vikas aghadi)

राष्ट्रवादीचे नेते बाजारबुणगे

पवार कुटुंब लेकराबाळासकट पंढपुरात आहे. त्यांचा साखर कारखान्यावर डोळा आहे. यांचं राजकारण केवळ श्रीमंतांसाठी आहे. मोदी सरकार गरिबांसाठी काम करत आहे, असं सांगतानाच राष्ट्रवादीचे नेते बाजारबुणगे आहेत. त्यांनी समाजासमाजात भांडणं लावण्याचं काम केलं आहे, अशी टीका दरेकर यांनी केलं. या सरकारमध्ये ताळमेळ नसून पुढील भविष्य ठरवणारी ही निवडणूक आहे, असंही ते म्हणाले. (gopichand padalkar and pravin darekar hit out maha vikas aghadi)

 

संबंधित बातम्या:

अजित पवारांनी राज्यातील 13 साखर कारखाने कवडीमोल भावाने घशात घातले; गोपीचंद पडळकरांचा घणाघाती आरोप

लॉकडाऊनमुळे भयभीत कामगारांची रेल्वे स्थानकांमध्ये प्रचंड गर्दी; रेल्वे म्हणते, पॅनिक होऊ नका!

‘चंद्र आहे साक्षीला’नंतर सुबोध भावे पुन्हा सिनेमाकडे, बालगंधर्वांचे नाटक रुपेरी पडद्यावर

(gopichand padalkar and pravin darekar hit out maha vikas aghadi)