सोलापूर : “राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी कोरोना लसीबाबत कोणताही दावा करु नये. सुप्रिया सुळे संसदेच्या सदस्या आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बाहेरून आलेलं म्हणणं ही शोकांतिका आहे. पुणे काय देशाच्या बाहेर आहे का? लोकसभेच्या सदस्य असून अशा प्रकारचे बालिश वक्तव्य करणे चुकीचे”, असा टोला भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी लगावला. सोलापुरात ते पत्रकार परिषदेत बोलत होते (Gopichand Padalkar on Supriya Sule statement).
सुप्रिया सुळे यांनी काल (28 नोव्हेंबर) पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौऱ्यावर टीका केली होती. मोदींनी काल पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन शास्त्रज्ञांशी कोरोना लसीबाबत चौकशी केली होती. मोदी यांच्या पुणे दौऱ्यावरुन सुप्रिया यांनी ‘दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नहीं’, असा टोला लगावला होता.
“एक लाख कोटींच्यावर गप्पा मारणारे आज पुण्यात आहेत. शेवटी पुण्यातच लस तयार होत आहे. ही लस पुणेकरांनी शोधली आहे नाहीतर कोणीतरी म्हणायचं मीच (स्वतःबाबत) शोधली”, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी मोदींवर निशाणा साधला होता. त्यांच्या या टीकेला भाजपकडून गोपीचंद पडळकर यांनी प्रत्युत्तर दिलं (Gopichand Padalkar on Supriya Sule statement).
‘हे सरकार संविधानावर चालत नाही’
दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारवर विविध मुद्द्यांवरुन सडकून टीका केली. “सरकारला एक वर्ष पूर्ण झालं तरी कॉमन मिनिमम प्रोग्राम काय आहे हे देखील सांगता आलं नाही. सरकारने कोणतेही आश्वासन पूर्ण केलं नाही. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या शपथेचा भंग केला. मग ते दसरा मेळावा असो किंवा परवाची त्यांची ‘सामना’ची मुलाखत. हे सरकार संविधानावर चालत नाही. माझा तर प्रश्न आहे, तुम्ही संविधान तरी मानता का?”, असा घणाघात त्यांनी केला.
“देशात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले. महाराष्ट्राला जे दिलं ते केंद्र सरकारने दिलं. राज्य सरकारने काय मदत केली ते महाविकास आघाडीच्या नेतृत्वाने सांगावे. राज्य सरकार संवेदनशील नाही”, अशी टीका पडळकर यांनी केली.
मराठा आरक्षणासाठी सरकार प्रामाणिक नाही : पडळकर
“राज्य सरकार कुठल्याही समाजाच्या आरक्षणविषयी प्रामाणिक नाही. मराठा समाजाविषयी तर नाहीच नाही. पत्रकार अर्णव गोस्वामी प्रकरणात लाखो रुपये देऊन वकील लावता येतो. मात्र मराठा आरक्षणाची कागदपत्रे वकीलांपर्यंत पोहोचवता येत नाहीत. अभिनेत्री कंगना रनौतचं घर पाडणं महत्त्वाचं वाटतं. मात्र मराठा आरक्षण संदर्भात एक बैठक घेता येत नाही”, अशा शब्दात गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर टीका केली.
संबंधित बातमी :
‘दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नहीं’; सुप्रिया सुळेंची मोदींवर खोचक टीका
संबंधित व्हिडीओ :