पुणे – लोकनेते गोपीनाथराव मुंडे (Gopinath Munde) ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या मुख्य कार्यालयाचे आज सायंकाळी सहा वाजता पुणे येथील सामाजिक न्याय भवन परिसर, येरवडा या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar), महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न होणार आहे. या महामंडळाच्या उद्घाटन कार्यक्रमास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री यांच्यासह गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, विधान परिषद उपाध्यक्षा डॉ. नीलम ताई गोऱ्हे, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांसह राज्यसभा सदस्य, लोकसभा सदस्य, विधान परिषद तसेच विधानसभा सदस्य, विविध ऊसतोड कामगार व वाहतूकदार संघटनांचे प्रतिनिधी व स्वतः ऊसतोड कामगार बांधव उपस्थित राहणार आहेत.
लोकनेते #गोपीनाथरावमुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या राज्यस्तरीय कार्यालयाचे उद्घाटन उद्या (३ एप्रिल) मुख्यमंत्री #उद्धवठाकरे यांच्या हस्ते #पुणे येथे होणार आहे. उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks, महसूल मंत्री @bb_thorat, सामाजिक न्यायमंत्री @dhananjay_munde आदी उपस्थित असतील. pic.twitter.com/aapECAomxV
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 2, 2022
अगदी लहानपणापासून ऊसतोड कामगारांचा संघर्ष, त्यांची पिढ्यानपिढ्या होत असलेली हेळसांड पाहत असताना, मनाला वेदना होत असत. समाजकारणात सक्रिय झाल्यापासून या प्रवर्गासाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन काहितरी विधायक करण्याचा माझा मानस राहिलेला आहे. यादृष्टीने आम्ही सत्तेत आल्यापासून मी सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
आज लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला मूर्त स्वरूप येत असून हा आपल्या आयुष्यातील एक सुवर्णक्षण आहे. पाडव्याच्या दुसऱ्या दिवसापासून ऊसतोड कामगारांच्या कल्याणाची नवी गुढी राज्य सरकारच्या माध्यमातून उभारत आहोत, याचा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही. हा दिवस माझ्यासाठी ऐतिहासिक असून, मी निवडून आलो, मंत्री झालो, त्याहीपेक्षा हा मोठा दिवस असल्याची भावनिक प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे व या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.