लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्याच मतदान बाकी आहे. पण महाराष्ट्रात सर्वच्या सर्व 48 जागांसाठी पाचव्या टप्प्यात मतदान पूर्ण झालं. 1 जून रोजी शेवटच्या टप्प्याच मतदान होईल. त्यानंतर 4 जूनला लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. मात्र, त्याआधीच महाराष्ट्रात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. लोकसभेला महायुतीमध्ये एकत्र असणारे भाजपा-मनसे पदवीधर निवडणुकीत आमने-सामने आले आहेत. पदवीधर मतदारसंघातून निवडून येणारा उमेदवार विधान परिषदेवर जातो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्याचवेळी भाजपाकडून निरंजन डावखरे रिंगणात आहेत. निरंजन डावखरे मागच्या दोन टर्मपासून कोकण पदवीधर मतदारसंघातून आमदार आहेत.
मनसे उमेदवार अभिजीत पानसे यांच्याशी टीव्ही 9 मराठीने या निवडणुकी संदर्भात संवाद साधला. “मी गेले अनेक महिने काम करत होतो. या निवडणुकीत नोंदणी प्रक्रिया असते. मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली आहे. पदवीधर मतदारसंघातून निवडून येणाऱ्या आमदाराने पदवीधरांसाठी काम केलं पाहिजे. मला कोणाचा इतिहास काढायचा नाही. कोकण पदवीधरांचा आमदार म्हणून काय केलं?. मी गेले अनेक वर्ष शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे” असं अभिजीत पानसे म्हणाले.
भाजपा विरोधात निवडणूक लढवण्यावर काय म्हणाले?
महायुतीमध्ये तुम्ही सोबत होता, आता परस्पराविरुद्ध निवडणूक लढवताय या प्रश्नावर अभिजीत पानसे म्हणाले की, “गुढीपाडव्याला शिवतीर्थावर राज ठाकरे आपल्या भाषणात स्पष्ट म्हणाले की, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत, म्हणून बिनशर्त पाठिंबा दिला होता. येणारी प्रत्येक निवडणूक मनसे लढवणार आहे. आम्ही महायुतीचा घटक पक्ष नव्हतो. आमचा स्वतंत्र पक्ष आहे”
महायुतीने पाठिंबा द्यावा असं वाटत का?
राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला, त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला पाहिजे असं वाटतं का? “आम्ही पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीत उतरलोय. आमच्याकडे नोंदणी आहे. कार्यकर्ते आहेत. कोणाचा पाठिंबा मिळो किंवा न मिळो. आम्ही विजयासाठी लढतोय, जिंकणार आहोत. त्यांनी पाठिंबा द्यायचा किंवा नाही हे त्यांना विचारा. असं काही होणार असेल तर माझ्या पातळीवर शक्य नाही.” असं अभिजीत पानसे म्हणाले.