Gujarat Assembly Election 2022 Result : गुजरात विधानसभा निवडणूक 2022 चा निकाल उद्या लागणार आहे. बहुप्रतिक्षित गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालावर संपूर्ण देशाचं लक्ष असेल. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचं हे राज्य आहे. गुरुवारी भाजप, काँग्रेस आणि आपच्या भवितव्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. भारतीय जनता पक्ष (भाजप) गेल्या 27 वर्षांपासून सरकारमध्ये आहे. यावेळीही त्यांना राज्यात बहुमत मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यासह भाजपचे अनेक स्टार प्रचारक गुजरातमध्ये तळ ठोकून होते. एक्झिट पोलच्या निकालात देखील भाजप (BJP) बहुमत मिळवेल असा विश्वास व्यक्त केला गेला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांचा AAP हा नवा स्पर्धक असल्याने राज्यातील काँग्रेसच्या मतांचा वाटा कमी होण्याची अपेक्षा आहे.
भाजपने राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनाच मुख्यमंत्रीपदाची उमेदवार म्हणून जाहीर केले होते.आपने इसुदान गढवी यांना गुजरातचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले होते. गुजरातमध्ये 182 जागांसाठी मतदान झालं. हार्दिक पटेल, रिवाबा जडेजा, लखाभाई भारवाड आणि अल्पेश ठाकोर यांच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
गुजरातचे मुख्य निवडणूक अधिकारी पी भारती यांनी सांगितले की मतमोजणी प्रक्रियेसाठी 182 मतमोजणी निरीक्षक, 182 निवडणूक अधिकारी आणि 494 सहायक निवडणूक अधिकारी कर्तव्यावर असतील.
गुजरातमधील भाजप मुख्यालयात जल्लोषाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. कारण एक्झिट पोलमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार असं दिसतंय. भाजपकडून त्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे.