जळगाव: राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांचं सरकार आलं आहे. काही आमदारांना मंत्रीपदे देण्यात आली आहेत. काहींना जुनीच खाती दिलीय. तर काहींना नवीन खाती देण्यात आली आहेत. या शिवाय पालकमंत्रीही जाहीर करण्यात आले आहेत. मात्र, शिंदे गटातील धुसफूस अजूनही सुरूच आहे. शिंदे गटातील काही मंत्री तर उघडपणे आपल्या मनातील खदखद बोलून दाखवताना दिसत आहेत. शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनीही आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. चांगल्या खात्याचा थोडा आग्रह धरला असता तर चांगलं मंत्रिपद मिळालं असतं, असं गुलाबराव पाटील म्हणाले. पाटील यांच्या या विधानावर आश्चर्य व्यक्त केलं जात असून या विधानाचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.
चांगल्या खात्यासाठी थोडासा आग्रह धरला असता तर यापेक्षाही चांगलं खातं मला मिळालं असतं, असं पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं. जळगाव जिल्ह्यातील फुलगाव येथे पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. पण जे चाललंय ते चालू द्या, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी अप्रत्यक्षपणे चांगल्या खात्याची अपेक्षा केल्याचे बोलले जात आहे.
तसेच आपल्या गावात सुरू केलेल्या योजनेवरूनही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पुढच्या वेळेस गाव मला मतदान करणार की नाही? असा संशय त्यांनी व्यक्त केला. गावात पाण्यासाठी डायरेक्ट मिटर बसवल्याचेही त्यांनी गावकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. काही लोक आमच्यात मध्ये मध्ये करतात. ज्यांना ठराव माहिती नसतो ते सुद्धा आम्ही योजना मंजूर करून आणली असे सांगतात. मात्र जन्माला बाळ आम्ही घालायचं आणि बारसं तुम्ही करायचं हा यांचा धंदा असल्याचेही गुलाबराव पाटील म्हणाले.