Hardik Patel : आधी पूजा नंतर प्रवेश! हार्दिक पटेल थोड्याच वेळात भाजपमध्ये प्रवेश करणार

| Updated on: Jun 02, 2022 | 10:03 AM

Hardik Patel : राष्ट्रहित, प्रदेशहित, जनहित आणि समाजहिताच्या भावनेसह मी आज नव्या अध्यायास सुरुवात करत आहे. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या राष्ट्रसेवेच्या भगीरथ कार्यात एक छोटा शिपाई होऊन मी काम करणार आहे, असं हार्दिक पटेल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Hardik Patel : आधी पूजा नंतर प्रवेश! हार्दिक पटेल थोड्याच वेळात भाजपमध्ये प्रवेश करणार
आधी पूजा नंतर प्रवेश! हार्दिक पटेल थोड्याच वेळात भाजपमध्ये प्रवेश करणार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अहमदाबाद: काँग्रेसला (congress) सोडचिठ्ठी दिल्यानंतर हार्दिक पटेल (Hardik Patel Joins BJP) कोणत्या पक्षात जाणार यावरचा सस्पेन्स आज अखेर संपुष्टात येणार आहे. हार्दिक पटेल आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील (Gujarat BJP Chief CR Patil) यांच्या उपस्थितीत हार्दिक पटेल भाजपमध्ये  प्रवेश करणार आहेत. सकाळी दुर्गा पूजा आणि गो पूजा केल्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपच्या राज्य प्रवक्त्यानेच ही माहिती दिली आहे. पाटीदार आंदोलनामुळे हार्दिक पटेल प्रकाशझोतात आले होते. त्यांच्या या आंदोलनामुळे भाजपची चांगलीच कोंडी झाली होती. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये आले होते. मात्र, वर्षभराच्या आतच त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हार्दिक पटेल भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. तसेच ते नवीन राजकीय संघटना काढू शकतात, असंही सांगितलं जात होतं. मात्र, आता ते भाजपमध्येच प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

 

हे सुद्धा वाचा

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर हार्दिक पटेल यांनी आज सकाळी एक ट्विट केलं होतं. राष्ट्रहित, प्रदेशहित, जनहित आणि समाजहिताच्या भावनेसह मी आज नव्या अध्यायास सुरुवात करत आहे. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या राष्ट्रसेवेच्या भगीरथ कार्यात एक छोटा शिपाई होऊन मी काम करणार आहे, असं हार्दिक पटेल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पूजापाठ करणार

हार्दिक पटेल यांच्या पक्षप्रवेशाचं भाजपने एक पोस्टर जारी केलं आहे. त्यातील माहितीनुसार हार्दिक पटेल यांच्या भाजप पक्षप्रवेशास सकाळी 9 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. सकाळी 9 वाजता हार्दिक पटेल त्यांच्या घरात दुर्गा पाठ करणार आहेत. त्यानंतर सकाळी 10 वाजल्यापासून ते एसजीव्हीपी गुरुकुलवर ते श्याम आणि घनश्यामाची आरती करणार आहेत. त्यानंतर साधू संतांच्या उपस्थितीत पूजा करतील. सकाळी 11 वाजता ते भाजपच्या कमलम या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

राजीनामा देताना काय म्हटलं होतं?

हार्दिक पटेल यांनी 18 मे रोजी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. ट्विट करून त्यांनी ही माहिती दिली होती. आज मी हिंमत करून आज मी काँग्रेस पक्षाच्या सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. तसेच पक्षाच्या पदाचाही राजीनामा देत आहे. माझ्या या निर्णयाचं गुजरातची जनता आणि माझे सहकारी स्वागत करतील असा मला विश्वास आहे. माझ्या या निर्णयाचा गुजरातलाच भविष्यात फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.