माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपले सासरे तथा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कारण हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात त्यांच्या पत्नी संजना जाधव या निवडणूक लढवत आहेत. संजना जाधव यांनी नुकतंच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून कन्नड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याच मतदारसंघात माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे देखील निवडणूक लढवत आहेत. तसेच कन्नडचे सध्याचे ठाकरे गटाचे विद्यमान आमदार उदयसिंह राजपूत हे देखील निवडणुकीच्या रणांगणात आहेत. त्यामुळे कन्नडमध्ये तिरंगी लढत होत आहे. तीनही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. पण असं असताना हर्षवर्धन जाधव यांनी संजना जाधव यांच्या उमेदवारीवरुन रावसाहेब दानवे यांच्यावर सडकून टीका केली आहे.
हर्षवर्धन जाधव आणि रावसाहेब दानवे यांच्यात गेल्या काही वर्षांमध्ये कौटुंबिक कलहातून वितुष्ट आले आहे. हर्षवर्धन जाधव हे कन्नडमधून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते 2009 मध्ये मनसेच्या तिकीटावर निवडून आले होते. तर 2014 मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते. त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाग घेतला होता. त्यांना 2 लाखांपेक्षा जास्त मते मिळाली होती. पण त्यांचा पराभव झाला होता. विशेष म्हणजे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव त्यांच्याचमुळे झाला होता. मतांचे विभाजन झाल्यामुळे खैरेंचा पराभव झाला होता. तर एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांचा विजय झाला होता.
यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी नुकतंच काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक लढवली होती. पण त्यांना केवळ 29 हजार मते मिळाली होती. यानंतर ते आता कन्नडमधून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. पण त्यांना आपल्या पत्नीचं कडवं आव्हान असणार आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत पती-पत्नी निवडणुकीच्या मैदानात आहेत. या राजकीय परिस्थितीवरुन हर्षवर्धन जाधव यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“आमच्या कुटुंबातील एका सदस्याला फोडून एका राजकीय पक्षाने तिकीट दिलं आहे. कुठेतरी या सगळ्या गोंधळाच्या पाठीमागे भाजप नेते रावसाहेब दानवे आहेत. माझं घर फोडलं. माझ्या विरोधात साक्षात माझी पत्नी उभी करण्याचं काम झालं, याचा मी जाहीर निषेध करतो”, असं हर्षवर्धन जाधव म्हणाले.
“दिवाळी दोन दिवसांवरती आलेली आहे. सर्वजण आपल्या कुटुंबासमवेत दिवाळी साजरी करत आहेत. माझ्याकडे दिवाळी साजरी करण्यासाठी कोणच उरलं नाही. मी आणि माझी आई दोघेचं उरलेलो आहोत. ठोकून काढू शेवटी धर्मयुद्ध आहे”, असं हर्षवर्धन जाधव म्हणाले.