Virender Sehwag : निवडणुकीच्या पीचवर उतरला विरेंद्र सेहवाग, या पक्षासाठी मागितली मतं

| Updated on: Oct 03, 2024 | 10:50 AM

Virender Sehwag : गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून विरेंद्र सेहवागची ओळख होती. हाच विरेंद्र सेहवाग आता राजकारणाच्या पीचवर उतरला आहे. त्यांच्यासाठी वोट देण्याच सेहवागने जनतेला अपील केलं. सेहवाग आपल्यासाठी मत मागतोय, याचा आनंद चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून आला.

Virender Sehwag : निवडणुकीच्या पीचवर उतरला विरेंद्र सेहवाग, या पक्षासाठी मागितली मतं
Virendra Sehwag
Image Credit source: instagram
Follow us on

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागची स्फोटक फलंदाज म्हणून ओळख होती. अगदी पहिल्या चेंडूपासून तो समोरच्या गोलंदाजाला झोडून काढायचा. गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून सेहवागची ओळख होती. हाच विरेंद्र सेहवाग आता राजकारणाच्या पीचवर उतरला आहे. हरियाणामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचा जोरात प्रचार सुरु आहे. हरियाणामध्ये विधानसभेच्या 90 जागांसाठी येत्या 5 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. त्यासाठी सर्वत्र जोरदार प्रचार सुरु आहे. वीरुने काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला. तोशाम येथून निवडणूक लढणारे काँग्रेस उमेदवार अनिरुद्ध चौधरी यांचं समर्थन केलं. त्यांच्यासाठी वोट देण्याच जनतेला अपील केलं. काँग्रेसच बटण दाबून अनिरुद्ध चौधरी यांना विजयी करण्याच तोशामच्या जनतेला आवाहन केलं.

विरेंद्र सेहवाग आपल्यासाठी वोट मागतोय, तो आनंद अनिरुद्ध चौधरी यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून आला. त्यासाठी त्यांनी सेहवागचे आभार मानले. विरेंद्र सेहवाग आणि अनिरुद्ध चौधरी यांची जुनी ओळख आहे. दोघेही जेव्हा भेटतात, तेव्हा क्रिकेटपेक्षा पर्सनल लाइफबद्दल जास्त चर्चा होते. अनिरुद्ध चौधरी आपल्यासाठी मोठ्या भावासमान असल्याच विरेंद्र सेहवाग म्हणाला. अनिरुद्ध चौधरी यांनी जनतेला जी आश्वासने दिलीयत ती ते नक्की पूर्ण करतील असा विश्वास सेहवागने आजतकशी बोलताना व्यक्त केला. अनिरुद्ध चौधरी निवडणूक जिंकले, तर जनतेला ते नाराज करणार नाही असं सेहवाग म्हणाला.


ते 5 ऑक्टोबरला समजणार

तोशामची जनता आपल्याला स्वीकारणार असा अनिरुद्ध चौधरी यांना पूर्ण विश्वास आहे. विरेंद्र सेहवागने जो प्रचार केला, त्याचा किती फायदा झाला ते येत्या 5 ऑक्टोंबरला समजेल. विरेंद्र सेहवागच्या क्रिकेट करियरबद्दल बोलायच झाल्यास त्याने भारतासाठी 374 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात 38 शतकं आणि 17 हजारपेक्षा जास्त धावा आहेत. सेहवाग सलामीला यायचा. सेहवागच्या आवाहनानंतर अनिरुद्ध चौधरी यांचा चंदीगडला जाण्याचा रस्ता खुला होणार का? ते लवकरच कळेल.