कोल्हापूर: विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात दणदणीत विजय मिळताच राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यात ऑपरेशन लोटस होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. राज्यात ऑपरेशन लोटस होणार नाही, हे स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला आहे. (hasan mushrif denied any “Operation Lotus” in maharashtra)
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीला यश मिळाल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना हा दावा फेटाळून लावला आहे. राज्यात तीन पक्ष एकत्र आल्यावर काय होऊ शकतं हे या निवडणुकीतून दिसून आलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होणार नाही, हे मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, असं ते म्हणाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुंबईत राहू लागल्यापासून त्यांचं नागपूरकडे दुर्लक्ष झालं आहे. त्यामुळेच नागपूरचे एक एक गड त्यांच्या हातून निसटून जात आहे, अशी खोचक टीका मुश्रीफ यांनी केली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हिमालयात जावं अशी माझी इच्छा नाही. पण भाजपला सत्तेची आणि संपत्तीची मस्ती आली होती. त्यामुळे त्यांच्याकडून वल्गना केल्या जात होत्या. अरेरावीची भाषा केली जात होती. कोणताही विजय हा विनयानं घ्यायचा असतो, हेच त्यांच्या लक्षात आलं नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
बॅलेट पेपर असल्यावर निवडणुकीचा निकाल काय लागू शकतो हे या निवडणुकीने दाखवून दिलं आहे. ईव्हीएम नसल्यामुळेच महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्याचं जनतेचं मत झालं आहे. आपलं मत सार्थकी लागल्याची भावनाही जनतेमध्ये निर्माण झाली आहे, असं सांगतानाच आता फडणवीस आणि चंद्रकांतदादाही काश, ईव्हीएम होता तो अच्छा होता, असं म्हणत असतील, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.
या निवडणुकीत आघाडीला यश मिळावं म्हणून तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अपार कष्ट घेतले. ही निवडणूक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसारखी झाली. या आधी या निवडणुका कधी पक्ष पातळीवर झाल्या नव्हत्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही या निवडणुकांमध्ये पूर्वी कधीच इतकं लक्ष घातलं नव्हतं. यावेळी दोन्ही पक्षांनी मतदार नोंदणीपासूनच लक्ष घालायला सुरुवात केली होती, असं ते म्हणाले. (hasan mushrif denied any “Operation Lotus” in maharashtra)
कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर विरोधकांनी टीका केली होती. लोकांना ही टीका आवडली नाही. त्यामुळेच मतदारांनी नागपूर आणि पुण्यात भाजपला हिसका दाखवला. यात जर दुर्देवानं उलटा निकाल लागला असता तर अनर्थ झाला असता. त्यांनी तर सरकार पाडण्याची डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती, असंही त्यांनी सांगितलं. (hasan mushrif denied any “Operation Lotus” in maharashtra)
MLC Election Maharashtra 2020 Result LIVE | पुणे, औरंगाबाद, नागपूर महाविकास आघाडीकडे https://t.co/MAW4QwsUK0 pic.twitter.com/bOn2Q9LXnz
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 4, 2020
संबंधित बातम्या:
तीन पक्षांच्या आघाडीमुळे समीकरणं बदलली, ऑपरेशन लोटस बारगळणार?; भाजपची डोकेदुखी वाढली
आम्ही एक तरी जिंकलो, पण ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा नाही : देवेंद्र फडणवीस
(hasan mushrif denied any “Operation Lotus” in maharashtra)