मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आज ईडी चौकशीला सामोरे गेले. मुश्रीफांची आज तब्बल आठ तास चौकशी झाली. या चौकशीनंतर हसन मुश्रीफ ईडी (ED) कार्यालयाबाहेर पडले तेव्हा प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुश्रीफांनी आपली भूमिका मांडली. यावेळी मुश्रीफ चांगलेच खूश दिसत होते. त्यांच्या देहबोलीतून ते आनंदी असल्याचं स्पष्ट दिसत होतं. ईडीच्या प्रश्नांना योग्य उत्तर देऊन ईडी चौकशीला सहकार्य केल्याची प्रतिक्रिया मुश्रीफांनी दिली.
“ईडीने दुपारी साडेबारा वाजता मला समन्स दिले होते. त्यामुळे साडेबारा वाजेपासून ते आतापर्यंत त्यांनी जे प्रश्नांची सर्व उत्तरे देत मी त्यांना सहकार्य केलं. मला त्यांनी आता पुन्हा सोमवारी चौकशीसाठी बोलावलं आहे. मी काही चुकीचं केलेलं नाही. त्यामुळे चौकशी अतिशय चांगली झाली. त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. आम्ही सुद्धा त्यांना सहकार्य केलं”, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली.
ईडीने हसन मुश्रीफ यांच्या घरावर दोनवेळा धाड टाकलीय. याशिवाय मुश्रीफ यांच्या संबंधित आणखी ठिकाणी छापे टाकले आहेत. विशेष म्हणजे ईडीने तीन दिवसांपूर्वी मुश्रीफांच्या घरावर धाड टाकल्यानंतर मुश्रीफ कुटुंबियांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले. या दरम्यान मुश्रीफ नॉट रिचेबल होते. पण त्यांच्या वतीने वकिलांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतलेली. हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या याचिकेत ईडीवर आरोप करण्यात आलेले. त्यांच्या याचिकेवर युक्तिवाद झाल्यानंतर कोर्टाने हसन मुश्रीफ यांना दोन आठवड्यांसाठी अटकेपासून सुरक्षा दिली.
हसन मुश्रीफ यांना पुढचे दोन आठवडे अटक करु नये, असे आदेश कोर्टाने दिले. त्यानंतर हसन मुश्रीफ आज ईडी अधिकाऱ्यांच्या चौकशीला सामोरे गेले. त्याआधी काल ते स्वत: ईडी कार्यालयात गेले होते. पण अधिकाऱ्यांनी त्यांना आपल्याला चौकशीसाठी उद्या बोलवू असं सांगितलं होतं. त्यानंतर मुश्रीफांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिलेली. या सगळ्या घडामोडींनंतर ते आज ईडी चौकशीला सामोरे गेले.