नवी दिल्ली | 10 ऑगस्ट 2023 : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कथित फ्लाईंग किसवरून वाद निर्माण झाला आहे. राहुल गांधी यांनी लोकसभेच्या आवारात फ्लाईंग किस दिल्याचा आरोप भाजप नेत्या स्मृती ईराणी यांनी केला आहे. हा स्त्रियांचा अपमान असून राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी स्मृती ईराणी यांनी केली आहे. भाजपच्या 22 महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना भेटून राहुल गांधी यांची तक्रारही केली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर कारवाई होते का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हा वाद सुरू असतानाच भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांनी आता त्यात उडी घेतली आहे.
फ्लाईंग किसच्या वादावर भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी राहुल गांधींना संसदेच्या आवारात फ्लाईंग किस करताना पाहिलं नाही, असं हेमा मालिनी म्हणाल्या. दरम्यान, भाजपच्या महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. राहुल गांधी यांचं हे वर्तन अशोभनीय आहे, असं या तक्रारीत म्हटलं आहे. विशेष म्हणजे या तक्रार पत्रावर हेमा मालिनी यांनी सही केली आहे.
राहुल गांधी यांना फ्लाईंग किस देताना पाहिलं नसतानाही हेमा मालिनी यांनी तक्रार पत्रावर सही केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राहुल गांधींना अडचणीत आणण्यासाठी जाणूनबुजून हे पत्र तर लिहिलं गेलं नाही ना? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. मी राहुल गांधी यांना फ्लाईंग किस देताना पाहिलं नाही. पण काही शब्द होते, ते योग्य नव्हते, असंही हेमा मालिनी म्हणाल्या. हेमा मालिनीचं हे विधान तात्काळ ट्विटरवर व्हायरल झालं.
अविश्वास ठरावावर संसदेत चर्चा सुरू होती. राहुल गांधी यांनी काल या चर्चेत भाग घेतला. खासदारकी बहाल झाल्यानंतर पहिल्यांदाच राहुल गांधी संसदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मोदी सरकारने मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली आहे. तुम्ही मणिपूरचे दोन भाग केले आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. त्यानंतर स्मृती ईराणी यांनी जोरदार भाषण करत राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिलं. यावेळी राहुल गांधी राजस्थानला जाण्यासाठी सभागृहाबाहेर पडले.
लोकसभा परिसराच्या आवारातून बाहेर जात असताना त्यांच्या हातातून काही फायली पडल्या. या फायली घेण्यासाठी खाली वाकले असता समोर असलेले भाजपचे खासदार त्यांना हसले. त्यामुळे राहुल गांधी यांनी त्यांच्याकडे बघून फ्लाईंग किस दिला आणि हसत हसत निघून गेले, असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. मात्र, हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झालेला नाही. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर कारवाई कशाच्या आधारे होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.