शिमला: हिमाचलप्रदेशमध्ये विधानसभेच्या तीन आणि लोकसभेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा प्रचंड विजय झाला आहे. काँग्रेसने या चारही जागेवर भाजपचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. नागरिकांच्या असंतोषामुळेच भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागल्याचं सांगितलं जात आहे. हिमाचल प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर झालेल्या क्लिन स्वीपमुळे भाजपच्या तंबूत चांगलीच खळबळ उडाली आहे.
हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघात 2019मध्ये भाजपचे रामस्वरुप शर्मा विजयी झाले होते. मात्र गेल्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यामुळे लागलेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह यांना मैदानात उतरवले. तर भाजपने कारगील युद्धाचे हिरो कुशल सिंह ठाकूर यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. या निवडणुकीत प्रतिभा सिंह यांना 36, 5650 मते मिळाली. तर भाजपच्या कुशल ठाकूर यांना 35 हजार 6884 मते मिळाली. प्रतिभा सिंह यांनी त्यांचा 8766 मताधिक्यांनी पराभव केला.
विधानसभेच्या तिन्ही जागांवर काँग्रेसने भाजपला पराभूत केलं आहे. जुब्बल कोटखाई, अर्की आणि फतेहपूर विधानसभेसाठी पोटनिवडणुकीत काँग्रेसने मैदान मारलं आहे. जुब्बल कोटखाई सीट भाजपच्या खात्यात होती. या मतदारसंघातून भाजपचे नरेंद्र बरागटा आमदार होते. त्यांच्या निधनानंतर या ठिकाणी निवडणूक झाली. माजी मुख्यमंत्री रामलाल ठाकूर यांचा मुलगा होरित ठाकूर यांनी विजय मिळवून काँग्रेसमध्ये विजयाची आशा निर्माण केली आहे. विशेष म्हणजे भाजपच्या या सीटिंग जागेवर भाजपच्या उमेदवाराचं डिपॉझिटच जप्त करण्यात आलं आहे. सहावेळा मुख्यमंत्री राहिलेले वीरभद्र सिंह यांच्या निधनामुळे अर्की विधानसभा मतदारसंघात निवडणूक झाली. ही जागाही काँग्रेसने राखली आहे. शिवाय फतेहपूर मतदारसंघातही काँग्रेसने विजय मिळविला आहे.
जनतेत प्रचंड रोष असल्यामुळेच भाजपचा पराभव झाल्याचं सांगितलं जात आहे. भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनीही हे मान्य केलं. वाढत्या महागाईमुळे आमचा पराभव झाल्याचं जयराम ठाकूर यांनी मान्य केलं आहे. स्वत: मुख्यमंत्र्यांनीच हा दावा केल्याने हिमाचलमध्ये भाजपला जनआक्रोश भोवल्याचं स्पष्ट होत आहे.
हिमाचल प्रदेशातील राजकीय इतिहास पाहता पोटनिवडणुकांनीच पुढील सत्तेचे दावेदार ठरवल्याचं दिसून येत आहे. पोटनिवडणुकीत पराभव झालेला कोणताही पक्ष आतापर्यंत सत्ता वाचवू शकलेला नाही. 1980नंतरचा इतिहास पाहिला तर, येथील जनतेने कोणत्याही एका पक्षाला दुसऱ्यांदा सत्तेची संधी दिलेली नाही. 1980 ते 1983 पर्यंत रामलाल ठाकूर मुख्यमंत्री होते. त्यानंतर वीरभद्र सिंह सत्तेत आले. त्यानंतर हा सिलसिला असाच सुरू राहिला. गेल्यावेळी मतदारांनी काँग्रेसला विरोधी पक्षात बसवून भाजपला सत्ता दिली. आता पोटनिवडणुकीचे निकाल पाहता मतदार काँग्रेसवर मेहरबान असल्याचं दिसून येत आहे.
VIDEO l SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 2 November 2021https://t.co/GUhMUwZ9M4#SuperFastNews #GaonSuperfast #Superfast50Gaon50Batmya
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 2, 2021
संबंधित बातम्या: