पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या राजेंद्र गावितांना बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव टक्कर देत आहेत. पालघरचे मतदान जसजसे जवळ येत आहे, तसे आरोप-प्रत्यारोपही वाढत जात आहेत. काल (21 एप्रिल) बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी नालासोपाऱ्यात भाजप-शिवसेनेवर कडाडून टीका केली. निवडणुका आल्या की ईडीची धमकी दाखवतात, पण ईडीला घाबरायला मी काय उद्धव ठाकरे आहे का? असा टोला हितेंद्र ठाकूर यांनी मारला. नालासोपारा पूर्वेकडील दामोदर सभागृहात बविआचे उमेदवार बळीराम जाधव यांच्या प्रचारार्थ आज सभा आयोजित करण्यात आली होती.
हितेंद्र ठाकूर नेमकं काय म्हणाले?
“निवडणुका आल्या की ईडीची धमकी दाखवतात, पण ईडीला घाबरायला मी काय उद्धव ठाकरे आहे का? मी जेलमध्ये जाऊन आलोय. भुजबळांची कोठडी खाली आहे, तिथे जाऊन राहीन. घाबरायला मी उद्धव ठाकरे नाही तर हितेंद्र ठाकूर आहे.” असा टोला हितेंद्र ठाकूर यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
तसेच, निवडणूक आली की मी 5 ते 15 कोटी रुपयांना विकणारा हितेंद्र ठाकूर नाही. मी मेल्यावर मला चंदनाच्या लाकडात जाला, असेही ठाकूर म्हणाले.
“पोटनिवडणुकीत कोथळा बाहेर काढायला निघाले होते, मला वाटले पुन्हा बाळासाहेब अवतरले की काय? पण हे तर चक्क म्याव निघाले, म्याव म्हणजे त्या मांजराचा अपमान होईल, त्यामुळे ती म्याव म्हणजे ‘माननीय उद्धव’ ठाकरे आहे. बाळासाहेबांचं पोरग कसं मर्दासारखा वागलं पाहिजे, पण याच्या पुढे एक प्रश्नचिन्हच आहे.”, असा घणाघात हितेंद्र ठाकूर यांनी केला.
पालघर जिल्ह्यातील वाणगाव येथे हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या पक्षासह आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते पैशावर विकले गेले असल्याचा गंभीर आरोप केला होता. तो व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. त्यामुळे काही कार्यकर्ते नाराज झाले होते. पण यावर ठाकूर यांना विचारले असता, त्यांनी पुन्हा त्याच वाक्याचा पुनरुच्चार करत मी बोललो आहे. आणि खरं बोललो आहे, खरं बोलायला पण एक धमक लागते असे सांगितले.
“वसई, विरार नालासोपारा हा बविआचा बालेकिल्ला आहे, या किल्ल्यात सुरूंग लावण्यासाठी शिवसेना भाजपाने मोठी ताकद पणाला लावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरारमधील गुंडगिरी संपविण्याची अनेक सभांमध्ये वक्तव्य केले आहे. पण 5 वर्षे त्यांची सत्ता आहे, त्यांनी काय बांगड्या भरल्या होत्या काय? का संपवली नाही गुंडा गर्दी, बामणाच्या मुहूर्ताची वाट पाहत होते काय?” असा प्रतिप्रश्न ठाकूर यांनी मुख्यमंत्री यांना केला आहे.