मुंबई : महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तासंघर्षावरील सुनावणी आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अन् एवढ्यातच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपच्या गोटात प्रचंड हालचाली सुरु आहेत. काँग्रेसची अंतर्गत गटबाजी उफाळून आलीय तर संजय राऊतांनीही मोठा दावा केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याची भाजपची तयारी असल्याचं संजय राऊत म्हणालेत. अजित पवार यांच्या मध्यंतरीच्या नॉट रिचेबल प्रकरणावरून चर्चांना उधाण आलंय. राहुल गांधी लवकरच उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी काल मोठं वक्तव्य केलंय. तुफान आ रहा है… केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) जिथे जातात, त्या ठिकाणी असंख्य राजकीय हालचाली सुरु होतात. शाह यांचं शनिवारी मुंबईत आगमन होतंय, त्यामुळेच ‘हे सर्व प्राणी घाबरलेत’ अशा आशयाचं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलंय. महत्त्वाची बाब म्हणजे फक्त विरोधकांसाठीच नव्हे तर सत्ताधारी शिंदे-फडणवीसही अमित शहांसमोर आज मोठी परीक्षा देतील, असं म्हटलं जातंय.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा शनिवारी आणि रविवारी मुंबई दौरा आहे. आज शनिवारी संध्याकाळी ते मुंबईत दाखल होतील. उद्या ज्येष्ठ निरुपणकार डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. रविवारी शहांच्या हस्ते अप्पासाहेबांना हा पुरस्कार दिला जाईल. तत्पुर्वी शनिवारी संध्याकाळी अमित शाह सह्याद्री अतिथि गृहात असतील. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करतील. भाजपच्या काही नेत्यांच्या भेटी घेतील.