गुजरात कॅडरचे IPS अधिकारी, थेट दिल्लीच्या पोलीस कमिश्नरपदी, राकेश अस्थानांना लॉटरी कशी लागली?

| Updated on: Jul 27, 2021 | 11:23 PM

राकेश अस्थाना हे चार दिवसानंतर म्हणजेच 31 जुलै रोजी निवृत्त होणार होते. त्यांची सेवा त्यादिवशी संपते. पण त्याआधीच त्यांना दिल्ली पोलीस कमिश्नर म्हणून नियुक्त करण्यात आलंय. त्यांचा कार्यकाळ हा एक वर्षाचा असेल.

गुजरात कॅडरचे IPS अधिकारी, थेट दिल्लीच्या पोलीस कमिश्नरपदी, राकेश अस्थानांना लॉटरी कशी लागली?
दिल्ली पोलीस कमिश्नरपदी राकेश अस्थानांची नियुक्ती
Follow us on

गेल्या काही वर्षात सर्वाधिक चर्चेत असलेले एक IPS अधिकारी म्हणजे राकेश अस्थाना. कधी ते सीबीआयचे
स्पेशल डायरेक्टर म्हणून चर्चेत राहीले तर कधी आसारामच्या केसमुळे. कधी कोर्टानं फटकारलं म्हणून तर
कधी ड्रग्जविरोधातल्या कारवायांमुळे. आता तर त्यांची दिल्ली पोलीस कमिश्नर म्हणून घोषणा करण्यात आलीय.
विशेष म्हणजे राकेश अस्थाना हे गुजरात कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत.

दिल्ली पोलीस हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे पोलीस कमिश्नरपदी अस्थानांच्या नावाचा
आदेश केंद्रीय गृहमंत्रालयानं काढलाय. सध्या अस्थाना हे बीएसएफचे डीजी (BSF DG) म्हणून कार्यरत आहेत.
विशेष म्हणजे अस्थाना हे सुरतचे कमिश्नरही राहीलेले आहेत. त्यांच्याच काळात आसारामच्या केसचा उलगडा
झाला होता. त्यानंतर सुशांतसिंह राजपुतच्या ड्रग्ज कनेक्शनची केसही अस्थानांच्याच निगराणीखाली चालली.


कोण आहेत राकेश अस्थाना?
राकेश अस्थाना हे गुजरात कॅडरचे 1984 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. लालू प्रसाद यादव यांच्या चारा
घोटाळ्याची महत्वपूर्ण चौकशीही अस्थाना यांच्याच नेतृत्वात झाली होती. त्यावेळेस ते सीबीआयचे एसपी
म्हणून कार्यरत होते. त्यानंतर लालू प्रसाद यादव हे सर्वोच्च शिखरावर असताना, चारा घोटाळ्यातच त्यांना
अटक झालेली होती. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर गुजरात कॅडरचे जे काही अधिकारी प्रतिनियुक्तीवर
केंद्रात आले त्यात अस्थानाही आले. सीबीआयचे स्पेशल डायरेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्याच काळात
त्याचा सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्यासोबत वाद झाला. नंतर अस्थानांची बदली सीबीआयबाहेर
करण्यात आली. आताही सीबीआयच्या संचालकपदासाठी अस्थानांचं नाव चर्चेत होतं. पण त्यांना थेट
दिल्लीच्या पोलीस कमिश्नरपदी नियुक्त करण्यात आलंय. विशेष म्हणजे दिल्लीच्या कमिश्नरपदी
एजीएमयूटी(AGMUT) अरूणाचल, गोवा, मिजोरम, आणि केंद्र शासित प्रदेश ह्या कॅडरच्याच अधिकाऱ्यांची
नियुक्ती केली जाते. पण अस्थाना याला अपवाद ठरलेत. गुजरात कॅडरचे अधिकारी असूनही ते दिल्लीच्या
पोलीस कमिश्नरपदी नियुक्त केले गेलेत.

निवृत्तीच्या चार दिवस आधी
राकेश अस्थाना हे चार दिवसानंतर म्हणजेच 31 जुलै रोजी निवृत्त होणार होते. त्यांची सेवा त्यादिवशी संपते.
पण त्याआधीच त्यांना दिल्ली पोलीस कमिश्नर म्हणून नियुक्त करण्यात आलंय. त्यांचा कार्यकाळ हा एक
वर्षाचा असेल.