मुंबई | 18 डिसेंबर 2023 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात आला आहे. दक्षिण मुंबईपासून ते कोल्हापूरपर्यंतच्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला आहे. मनसे लोकसभेच्या 25 जागा लढण्याच्या मनस्थितीत आहे. तशी माहितीच मनसेचे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे. सर्वच लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाली. राज ठाकरे यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. आजच्या बैठकीत 25 च्यावर लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला आहे. आम्ही 25 जागा लढण्याच्या मनस्थितीत आहोत. आमच्यासाठी चांगली परिस्थिती दिसत आहे, असं आमदार राजू पाटील म्हणाले.
आमदार राजू पाटील आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांननी मीडियाशी संवाद साधला. यावेळी राजू पाटील यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली. राऊत यांनी आत्मपरीक्षण करावं. त्यांचं स्वत:चं काय सुरू आहे ते पाहा. आम्ही आहोत तिथेच आहोत. आम्ही आजपर्यंत कुठे युती किंवा आघाडी केली नाही. त्यांनी कोणा कोणाशी कधी कधी युती केली आहे त्याचं आत्मपरीक्षण करावं, असा चिमटा राजू पाटील यांनी काढला.
यावेळी बाळा नांदगावकर यांनीही आजच्या बैठकीवर भाष्य केलं. लोकसभेच्या किती जागा लढवायच्या आहेत याचा आढावा आम्ही घेतला. दक्षिण मुंबईपासून सुरुवात केली. कोल्हापूरपर्यंतच्या मतदारसंघाचा आढावा घेतला. कोणता मतदारसंघ लढवायचा? कसा लढवायचा? कोणती भूमिका घ्यायची? याचा आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला, असं बाळा नांदगावकर म्हणाले.
यावेळी बाळा नांदगावकर यांनी संजय राऊत यांच्या विधानावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. मला असं वाटतं त्यांनी पहिली ठाम भूमिका घेतली पाहिजे. बाळासाहेबांच्या विचारापासून त्यांनी फारकत घेतली आहे. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललो आहोत. तरीपण आम्ही राऊत यांचे आभारी आहोत, असं नांदगावकर म्हणाले.
2017 ला मी मातोश्रीला गेलो होतो. तेव्हा मीच महानगरपालिकेबाबत प्रपोजल दिलं होतं आणि 2014 ला त्यांनी आम्हाला प्रपोजल विधानसभेला दिले होते. त्यात बरेच पाणी वाहून गेलेलं आहे. त्यांनी आपली एक भावना बोलून दाखवली. त्यांचं मी स्वागत करतो. याबाबतचा विचार पक्षप्रमुख घेतील. कारण कधी कधी कुठल्या कुठल्या गोष्टीचा वेळेवर विचार होणं फार महत्त्वाचं असतं. वेळेवर जर एखादी गोष्ट घडली नाही तर परिणामना सामोर जावं लागतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
2014 ला तुम्ही आमच्याकडे आला होता. तेव्हा आम्ही तुमच्यासोबत जाण्याची तयारी केली होती. तेव्हा तुम्ही आमचा विश्वासघात केला. तरीही आम्ही 2017 ला तुमच्याकडे आलो होतो. आमचे सहा नगरसेवक तुम्ही फोडले होते. तेव्हा सुद्धा आम्ही तुमच्याकडे आलो होतो. तुम्ही आमचा सन्मान केला नाही. पण ठीक आहे आता तुम्ही म्हणताय त्याबद्दल आम्ही आभारी आहोत, असंही ते म्हणाले.