हैदराबाद पालिका निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर; तरीही भाजपचा दक्षिणेवरील स्वारीचा मार्ग मोकळा?

| Updated on: Dec 04, 2020 | 5:39 PM

ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपने जबरदस्त कामगिरी केली आहे. निवडणुकीच्या कलानुसार 150 जागांपैकी भाजपने 41 जागांवर आघाडी घेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. (hyderabad GHMC polls Result And Bjp Future Prospects In Telangana)

हैदराबाद पालिका निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर; तरीही भाजपचा दक्षिणेवरील स्वारीचा मार्ग मोकळा?
Follow us on

हैदराबाद: ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपने जबरदस्त कामगिरी केली आहे. निवडणुकीच्या कलानुसार 150 जागांपैकी भाजपने 41 जागांवर आघाडी घेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने अवघ्या 37 जागांवर आघाडी घेतली असून टीआरएसने 65 जागांवर आघाडी घेऊन बहुमताकडे वाटचाल केली आहे. ओवेसींना त्यांच्या बालेकिल्ल्यातच धोबीपछाड व्हावं लागलं असून अवघ्या चार नगरसेवकांच्या जीवावर निडणूक लढवणाऱ्या भाजपने मात्र आश्चर्यकारक झेप घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. एवढेच नव्हे तर हैदराबाद निवडणुकीत भाजप दुसऱ्या क्रमांकावर गेली असली तरी दक्षिणेवर स्वारी करण्यासाठी भाजपसाठी हे यश अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे. (hyderabad GHMC polls Result And Bjp Future Prospects In Telangana)

हैदराबादेतील निवडणूक महत्त्वाची का?

ग्रेटर हैदराबाद पालिका देशातील सर्वात मोठ्या पालिकेपैकी एक आहे. एकूण चार जिल्ह्यात ही पालिका आहे. त्यात हैदराबाद, मेडचल- मलकाजगिरी, रंगारेड्डी आणि संगारेड्डी जिल्ह्यांचा समावेश आहे. या चारही जिल्ह्यांमध्ये 24 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात तेलंगणाच्या लोकसभा सीटही येतात. त्यामुळेच पालिका ताब्यात घेण्यासाठी केसीआरपासून ते भाजप, काँग्रेस आणि ओवेसींनी जंगजंग पछाडले आहे.

46 टक्क्याहून अधिक मतदान

हैदराबाद पालिकेसाठी यंदा 46.55% मतदान झालं. 2009च्या पालिका निवडणुकीत 42.04 टक्के तर 2016 मधील निवडणुकीत 45.29 टक्के मतदान झालं होतं. मात्र गेल्या दोन निवडणुकांपेक्षा यंदा सर्वाधिक मतदान झाल्याने या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

कुणाला किती टक्का?

2016 च्या पालिका निवडणुकीत टीआरएसला 43.85 टक्के मतं मिळाली होती. एमआयएमला 15.85 टक्के आणि टीडीपीला 13.11 टक्के मतं मिळाली होती. तर भाजपला 10.34 टक्के मतं मिळाली होती.

टीआरएसलाच बहुमत

2016 च्या पालिका निवडणुकीतही टीआरएसला बहुमत मिळालं होतं. या निवडणुकीत टीआरएसने 150 पैकी 99 वार्डात विजय मिळवला होता. ओवेसींच्या एमआयएमला 44 वार्डांत विजय मिळाला होता. तर भाजपला केवळ चार आणि काँग्रेसला अवघ्या दोन जागांवर विजय मिळाला होता.

हैदराबादवर भाजपचं लक्ष का?

या पालिका निवडणुकीत भाजपने जोरदार प्रचार केला होता. हैदराबादमध्ये जम बसवण्यासाठी भाजपने बड्या नेत्यांची फौज उतरवून आक्रमक प्रचार केला होता. गेल्यावेळी केवळ चार जागा जिंकणाऱ्या भाजपने 25 जागा जिंकल्या तरी त्यांच्यासाठी हे मोठं यश असल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे. हैदराबादमध्ये विधानसभेच्या 24 आणि लोकसभेच्या 5 जागा येतात. येथील लोकसंख्या 82 लाखापेक्षा अधिक आहे. मुस्लिमांच्या तुलनेत हिंदुंची लोकसंख्याही या भागात मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे भाजपने हैदराबाद मिळवण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. पालिका निवडणूक ही त्यांच्यासाठी लिटमस टेस्ट आहे. या निवडणुकीत 20-25 जागांवरही विजय मिळविता आला तरी त्या बळावर संपूर्ण हैदराबादभर हातपाय पसरण्यासाठी भाजपला वाव मिळणार आहे. हैदराबादेतील यशानंतर भाजपला तेलंगानाच्या दिशेनेही मोर्चा वळवायचा आहे. तेलंगनामध्ये विधानसभेच्या 119 जागा असून तेलंगनात भाजपचे केवळ दोनच आमदार आहेत. दुसरीकडे तेलंगनात लोकसभेच्या 17 जागा असून भाजपचे चार खासदार आहेत. त्यामुळे हैदराबाद जिंकतानाच तेलंगनातही पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने भाजपसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असल्याचं मानलं जात आहे. (hyderabad GHMC polls Result And Bjp Future Prospects In Telangana)

दक्षिणेवरील स्वारीचा मार्ग मोकळा होणार?

दक्षिण भारतात हातपाय रोवणे भाजपसाठी नेहमीच आव्हानात्मक राहिले आहे. अगदी मोदी लाटेतही त्यांना दक्षिणेवर स्वारी करता आलेली नाही. कर्नाटक वगळता आंध्र प्रदेश, तेलंगना, तामिळनाडू आणि केरळमध्ये भाजपचा म्हणावा तसा प्रभाव नाही. दक्षिणेकडील या राज्यात भाजपला आपल्या बळावर काहीच करता आलेले नाही. त्यामुळे त्यांना आघाडीचं राजकारण करून काही जागा निवडून आणावं लागतं. मात्र हैदराबाद महापालिका निवडणुकीत विजय मिळवून दक्षिणेवरील स्वारी करण्याची व्यूहरचना भाजपला करायची आहे. त्यानुसार भाजपकडून गणितं मांडली जात आहेत. हैदराबादमध्ये होणाऱ्या विजयाच्या अनुषंगाने भाजप नेते अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी रणनीती तयार केल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

विधानसभा निवडणुकीत काय घडलं?

2018च्या विधानसभा निवडणुकीत टीआरएसने आंध्र प्रदेशात 88 जागांवर विजय मिळवला होता तर काँग्रेसने 21 जागांवर विजय मिळविला होता. एमआयएमला केवल 7, इतरांना 2 आणि भाजपला दोन जागांवर विजय मिळाला होता. विधानसभा निवडणुकीत भाजपला राज्यात 7.07 टक्के मतं मिळाली होती. तर टीआरएसला 47 टक्क्याहून अधिक मतं मिळाली होती. तर काँग्रेसला 32 टक्क्याहून अधिक मतं मिळाले होते. (hyderabad GHMC polls Result And Bjp Future Prospects In Telangana)

 

संबंधित बातम्या:

Hyderabad Election Results 2020 Live Updates: हैदराबादमध्ये TRS नंबर वनवर, तर भाजप तिसऱ्या स्थानी घसरले

तीन पक्षांच्या आघाडीमुळे समीकरणं बदलली, ऑपरेशन लोटस बारगळणार?; भाजपची डोकेदुखी वाढली

ये क्या हुआ? कैसे हुआ? कब हुआ? क्यों हुआ?, विरोधकांच्या गर्विष्ठ माना जनतेने वाकवल्या; अनिल देशमुखांची खोचक टीका

(hyderabad GHMC polls Result And Bjp Future Prospects In Telangana)