मुंबई: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ईडीकडून (ED) ही चौकशी होणार असल्याचं सांगितलं जात असतानाच अजित पवार यांनी या प्रकरणावर मोठं विधान केलं आहे. हे प्रकरण 2012 पासूनचे आहे. या प्रकरणात प्रत्येकवेळी अजित पवारांचे नाव येते. याप्रकरणात 75 लोकंही आहेत. पण त्या 75 लोकांची नावे येत नाहीत. फक्त अजित पवार यांचे नाव, फोटो, हेडलाईन होते, असं सांगतानाच त्यांचे सरकार (maharashtra government) आहे काय चौकशी करायची ती करा, असं आव्हानच अजित पवार यांनी दिलं.
अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हे आव्हान दिलं. या देशाचा मी नागरीक आहे. मी कायदा आणि संविधान मानणारा आहे. त्यामुळे माझी जे कुणी चौकशी करतील त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची माझी तयारी आहे, असं अजित पवार म्हणाले.
माझी चौकशी सहकार विभागामार्फत, निवृत्त न्यायाधीशांमार्फत, सीआयडी, एसीबी आणि आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने केली. मात्र आता आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग चौकशी करणार अशी पुन्हा बातमी कानावर आलीय. ही बातमी तुमच्या माध्यमातून वाचली, पाहिली. परंतु याबाबत मला माहिती नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी त्यांनी सत्ताधारी आमदारांना खडेबोल सुनावले. या सरकारला शंभर दिवस झाले तरी यासरकारमधील लोकप्रतिनिधीना आपण काय बोलतोय आणि कसे बोलतोय याचे तारतम्य राहिलेले नाही. शिवाय अधिकार्यांशी उर्मट भाषा बोलली जात आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी केला.
यावेळी त्यांनी राज्यातील पावसाळी परिस्थितीवरही भाष्य केलं. राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुणे तर जलमय करुन टाकले आहे. तर दुसरीकडे पुन्हा एका चक्रीवादळाचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे जनतेला अलर्ट केले पाहिजे. शिवाय धरणाचे पाणी सोडत असताना नदीकाठच्या लोकांनाही सतर्क केले पाहिजे आणि या घटनांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करतो असे सरकारने सांगितले होते. मात्र अद्याप पैसे जमा केलेले नाहीत, असे शेतकरी सांगत आहेत. अशी दयनीय अवस्था राज्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष द्यावे, असं आवाहन त्यांनी केलं.