मुंबई : गेले अनेक दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात स्वबळ दाखवण्याची स्पर्धा सुरु आहे. कारणही तसंच आहे, येऊ घातलेल्या निवडणुका… पहिल्यांदा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट केलं, त्यात भरीस भर म्हणजे हायकमांडला मान्य असेल तर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार मी होईन, असंही त्यांनी जाहीर केलं. दुसरीकडे केंद्रrय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही भाजप स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट केलं. दोन पक्षांच्या स्वबळाच्या घोषणेनंतर आता आजच्या सामना अग्रलेखातून महाराष्ट्राच्या उद्याच्या राजकारणाचं भाकित वर्तवण्यात आलंय. “भाजप आणि काँग्रेससारखे पक्ष स्वबळाच्या दिशेने तयारी करीत आहेत हे चांगलेच झाले. आता महाराष्ट्रात राहता राहिले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनच पक्ष…. सगळेच स्वबळावर लढत असतील तर या दोन प्रमुख पक्षांना महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावे लागेल”, असं आजच्या सामना (Saamana Editorial) अग्रलेखात म्हटलंय. (If Congress and BJP are fighting on their own then NCP and Shiv Sena will have to fight together for the benefit of Maharashtra Says Sanjay Raut Saamana Editorial)
स्वबळावर लढून सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करणे यात चुकीचे काय आहे? भाजप व काँग्रेससारखे पक्ष त्या दिशेने तयारी करीत आहेत हे चांगलेच झाले. आता महाराष्ट्रात राहता राहिले शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनच पक्ष. सगळेच स्वबळावर लढत असतील तर या दोन प्रमुख पक्षांना महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावे लागेल व त्याचे सूतोवाच उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी केलेच आहे.
महाराष्ट्रात आधीच स्वबळाचे अजीर्ण झाले आहे. त्यात आणखी भर नको. महाराष्ट्रात रोज एक नवी समस्या उभी राहत आहे. राज्य अस्थिर व्हावे, आर्थिकदृष्ट्या कमजोर पडावे यासाठी राजकारणातील काही दुष्ट शक्ती टपून बसल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचे अजीर्ण झाले की ते वाईटच…
महाराष्ट्राच्या राजकारणात स्वबळाचे अजीर्ण झालेले दिसते. कारण जो उठतोय तो उद्याच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याची भाषा करीत आहे. एका बाजूला राज्यात मराठा, ओबीसी, धनगर आरक्षणाच्या मुद्दय़ाने जोर धरला आहे. कोल्हापुरात सर्वपक्षीय लोकांनी एकत्र येऊन मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले. धनगरांना वेळीच आरक्षण मिळाले नाही तर पंढरपुरातील विठोबा माऊलीची महापूजा रोखण्याची भाषा सुरू झाली आहे. ‘ओबीसी’चे पुढारीही रस्त्यांवर उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यात कोरोनाचा धुमाकूळ पूर्णतः थांबलेला नाही. या परिस्थितीतही काही लोकांना राजकारण, निवडणुका, स्वबळाचे वेध लागले आहेत. महाराष्ट्राचे लोक राजकारणग्रस्त आहेत, पण ते इतके ‘ग्रस्त’ असतील असे कधीच वाटले नव्हते.
महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले हे एक झुंजार नेते आहेत. त्यांनीही आता आगामी निवडणुका स्वबळावर लढून महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणण्याची गर्जना केली आहे. स्वबळावर सत्ता आणू व काँग्रेसचा मुख्यमंत्री स्वबळावर करू, असे त्यांनी आत्मविश्वासाने जाहीर केले आहे. मुख्यमंत्री कोण, हा संभ्रम त्यांच्या मनात दिसत नाही. मुख्यमंत्री मीच, पक्षाने परवानगी दिली तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आपण बनण्यास तयार असल्याचे विधानही त्यांनी केले आहे. त्यामुळे नाना पटोले हे 2024 साली महाराष्ट्राच्या गादीवर काँग्रेसचा मुख्यमंत्री बसवल्याशिवाय राहणार नाहीत हे आता नक्की झाले आहे.
ज्याच्यापाशी145 आमदारांचे बहुमत आहे त्याचे सरकार बनेल व त्यांचा मुख्यमंत्री होईल, असे मत नानांच्या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे, तेही खरेच आहे. संसदीय लोकशाही हा बहुमताच्या आकड्यांचा खेळ आहे. हा खेळ ज्याला जमेल तो गादीवर बसेल. राजकारणात इच्छा, महत्त्वाकांक्षा असायला हरकत नाही, पण शेवटी बहुमताचा आकडा नसेल तर बोलून व डोलून काय होणार? ‘मी पुन्हा येईन’ असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत होते. ते आले नाहीत. त्यांच्या भारतीय जनता पक्षाचे 105 आमदारांचे बळ वाया गेले आणि तीन पक्षांनी एकत्र येऊन बहुमत बनवले. त्यामुळे 2024 चा हवाला आता कोणीच देऊ नये.
नाना पटोले यांचा पक्ष महाराष्ट्रात सत्तेत आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस हा महत्त्वाचा घटक आहे, पण महाराष्ट्रात त्यांचा पक्ष आज तिसऱया स्थानावर असल्याने स्वबळाची गर्जना करून नाना पटोलेंनी पक्षातील कार्यकर्त्यांत आत्मविश्वास निर्माण केला. नाना पटोले यांनी स्वबळाची घोषणा करताच भाजपचे तालेवार नेते रावसाहेब दानवे यांनी 2024 च्या निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार असल्याची चावी फिरवली.
दानवे यांचे म्हणणे आहे की, पुन्हा शिवसेना – भाजप युती शक्यच नाही. त्यामुळे स्वबळावरच लढावे लागेल. दानवे पुढे म्हणतात ते महत्त्वाचे, राजकारणात कोण, केव्हा आणि कधी जवळ येईल ते सांगता येत नाही. रावसाहेबांचे हे विधान सोळा आणे सत्य आहे. राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रूही नसतो आणि मित्रही नसतो. महाराष्ट्रात दीड वर्षापूर्वी ज्या घडामोडी घडल्या त्यातून हेच सिद्ध झाले.
दानवे यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली हे बरे झाले. दानवे हे केंद्रात मंत्री आहेत. राज्यातील भाजपमध्ये त्यांचे वजन आहे. त्यामुळे दानवे बोलतात ते वायफळ नाही हे मान्यच करावे लागेल. 2024 चे मैदान अद्याप लांब आहे, पण प्रमुख राजकीय पक्ष लोकसभा, विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा अचानक करू लागले आहेत. लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुका मुदतीपूर्व लावून घेण्याच्या हालचाली कोणी करत आहे काय? भाजपच्या जवळ जाईल व एकत्र लढतील असा पक्ष महाराष्ट्रात दिसत नाही. त्यामुळे भाजपास स्वबळावर लढणे अपरिहार्य आहे. दानवे यांनी तेच सत्य मांडले.
सरतेशेवटी स्वबळावर लढून सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करणे यात चुकीचे काय आहे? भाजप व काँग्रेससारखे पक्ष त्या दिशेने तयारी करीत आहेत हे चांगलेच झाले. आता महाराष्ट्रात राहता राहिले शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनच पक्ष. सगळेच स्वबळावर लढत असतील तर या दोन प्रमुख पक्षांना महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावे लागेल व त्याचे सूतोवाच उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी केलेच आहे, असं आजच्या अग्रलेखात म्हटलंय.
(If Congress and BJP are fighting on their own then NCP and Shiv Sena will have to fight together for the benefit of Maharashtra Says Sanjay Raut Saamana Editorial)
हे ही वाचा :
सर्व राजकीय नेत्यांच्या मुखी मराठा असला तरी मराठ्यांच्या हाती मात्र खराटाच : उदयनराजे भोसले
Video : भाजपच्या पदाधिकारी अक्षता तेंडुलकरांचा चप्पल दाखवतानाचा व्हिडीओ समोर!
Video : शिवसेना भाजप वाद; किशोरी पेडणेकरांकडून बाळासाहेबांचा व्हिडीओ ट्वीट करत भाजपला इशारा