मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीसोबत जाण्याची शक्यता आहे. त्या संदर्भातील चर्चा महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. आज किंवा उद्या या बातमीवर शिक्कामोर्तब होऊ शकत. मागच्या दोन-तीन दिवसांपासून त्या संदर्भातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. राज ठाकरे स्वत: दिल्लीला जाऊन अमित शाहना भेटून आले. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर कालरात्री गुप्त बैठक झाली. आता वांद्रयाच्या ताज लॅन्डस हॉटेलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात बैठक सुरु आहे. या दरम्यान भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी मनसेच्या महायुतीमधील समावेशाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. आधी प्रवीण दरेकर मनसेमध्ये होते. मनसेच्या तिकीटावर ते मागाठणे विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. नंतर ते भाजपामध्ये दाखल झाले.
“राज ठाकरे महायुतीमध्ये आल्यास निश्चित महाराष्ट्राच्या जनतेला हा निर्णय आवडेल. बाळासाहेबांची हिंदुत्वाची विचारधारा पुढे घेऊन जाण्याच काम राज ठाकरे करत आहेत. त्यांचे आमचे सूर जमतायत असे संकेत देवेंद्रजींनी दिले होते. त्यांनी आता व्यापक हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली आहे” असं प्रवीण दरेकर म्हणाले. “राज ठाकरे सोबत आले, तर आनंदच आहे. देवेंद्रजींनी संकेत दिले होते. राज ठाकरे अमितभाईंना सुद्धा भेटून आले. आता मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुरु आहे” असं प्रवीण दरेकर म्हणाले.
दक्षिण मुंबईच्या जागेवर प्रतिक्रिया काय?
मनसे महायुतीमध्ये आल्यास दक्षिण मुंबईची जागा मनसेला मिळणार का? या प्रश्नावर प्रवीण दरेकर म्हणाले की, “अशा प्रकारच्या अनेक चर्चा आहेत. शिर्डीची जागा बाळा नांदगावकरांना दिली जाईल का? भाजपामध्ये जे पक्ष आले, त्यांना सामील करुन घेतलं, त्यांचा सन्मान केला. कुठली जागा द्यायची हे पक्षश्रेष्ठी ठरवतील. परंतु त्यांचा सन्मान निश्चित होईल”