राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. खून, दरोडे, बलात्कार यांचे प्रमाण वाढले आहे. त्याकडे गृहखात्याचे व सरकारचे लक्ष नाही. पण, आपल्या बगलबच्च्यांसाठी पोलीस दल तैनात ठेवले आहे. समित कदम सारख्या सरकार आणि व्यापाऱ्यांच्या मध्यस्थांना वाय दर्जाची सुरक्षा दिली जाते. तर, महिला सुरक्षा आणि जनता मात्र वाऱ्यावर आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. फडणवीस हे साडे सात वर्ष गृहमंत्री पदावर आहेत. त्यांना या खात्याचा मोठा अनुभव आहे. अनिल देशमुख यांचे काही व्हिडोओ आणि ऑडिओ क्लिप्स त्यांच्याकडे आहेत असा त्यांचा दावा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये हिम्मत असेल तर त्यांनी जनतेसमोर सत्य मांडावे आणि संभ्रम दूर करावा, असे आव्हानही त्यांनी दिले.
सरकारने सत्ताधारी पक्षातील अनेक आमदारांना गरज नसतानाही पोलीस सुरक्षा दिली. त्याचप्रमणे समित कदम या सरकार आणि व्यापारी यांच्यातील मध्यस्थ व्यक्तीलाही वाय दर्जाची सुरक्षा दिली. अनिल देशमुख हे जामिनावर जेलमधून बाहेर आले. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार यांच्याविरोधात खोट्या प्रतिज्ञापत्रावर सह्या करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दबाव आणला होता हे सांगितले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस गप्प का होते? देशमुख खोटे बोलत असतील तर त्यांच्यावर कारवाई का केली नाही? असा सवालही त्यांनी केला.
फडणवीस सरकारच्या काळात विरोधी पक्ष नेत्यांचे फोन टॅप करत होते. ज्यांनी फोन टॅप केले त्या अधिकाऱ्याला पोलीस महासंचालक पदी बढती दिली. त्यामुळे फडणवीस यांनी विरोधकांना धमकी देण्याऐवजी वस्तुस्थिती मांडावी असे आव्हान नाना पटोले यांनी दिले. देशमुख आणि फडणवीस हे एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. अनिल देशमुख यांनी केलेले आरोप खरे आहेत की खोटे हे जाणण्याचा अधिकार राज्यातील जनतेला आहे, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात दोन वर्षापूर्वी जे सत्तांतर झाले ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नव्हते. हे सत्तातर करताना देवेंद्र फडणवीस वेश बदलून भेटी घेत होते हे त्यांनीच सांगितले. आता दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तेच सांगितले. दहावेळा वेशांतर करुन दिल्लीत भेटी घेतल्या असे अजित पवार म्हणाले. यामुळे सत्तेसाठी भारतीय जनता पक्ष काहीही करु शकतो हे स्पष्ट होते. त्यामुळे हे सरकार असंवैधानिक आहे अशी टीकाही पटोले यांनी केली.