गुवाहाटी: एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबतचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेकडून (shivsena) केला जात आहे. अनिल देसाई यांनी शिवसेनेच्या संपर्कात 20 आमदार असल्याचं म्हटलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनीही तेवढेच लोक आपल्या संपर्कात असल्याचं म्हटलं आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी तर 15 आमदार आमच्या संपर्कात असल्याचं म्हटलं आहे. त्यावर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे पलटवार केला आहे. सहा दिवसानंतर पहिल्यांदाच शिंदे यांनी थेट मीडियासमोर उभं राहून प्रतिक्रिया दिली. तुमच्या संपर्कात आमदार आहेत तर त्यांची नावे सांगा. ती यादी जाहीर करा. म्हणजे स्पष्टतता येईल, असं आव्हानच एकनाथ शिंदे यांनी दिलं. शिंदे यांच्या या आव्हानाल आता शिवसेना कशी प्रत्युत्तर देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
बाहेर काही लोक सांगत आहेत. आमच्या संपर्कात एवढे लोक आहेत. तेवढे लोक आहेत. त्यांनी संपर्कात असलेल्या आमदारांची नावे जाहीर करावी. त्यानंतर सर्व स्पष्टता येईल, असं सांगतानाच खोटी माहिती देऊन समोरचे लोक दिशाभूल करण्याचं काम करत आहेत. त्यावर विश्वास ठेवू नका, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला.
आमदारांना पळवून नेलंय. त्यांना बंदीवान केलंय. त्यांना मारहाण केल्याचा आरोपही शिवसेनेतून केला जात होता. हा आरोपही त्यांनी खोडून काढला. या ठिकाणी 50 आमदार आले आहेत. ते खूश आहेत. आनंदात आहेत. हे सर्व लोक स्वत:च्या मर्जीने आले आहेत. स्वार्थासाठी आले नाहीत. कुणाच्याही दबावाखाली आले नाहीत. ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका पुढे घेऊन जात आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
मी आजही शिवसेनेत आहे. यात शंका नाही. बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाची भूमिका घेऊन आम्ही जात आहोत, असं सांगतानाच आमची पुढची भूमिका तुम्हाला सांगत राहू. आमच्या शिवसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर आहेत. ते तुम्हाला वेळोवेळी आमची भूमिका सांगत राहतील, असंही त्यांनी सांगितलं.